Pune : कोंढवा भागातून वसंत मोरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार – साईनाथ बाबर

मनसेला मतदान करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय

एमपीसी न्यूज – हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास नगरसेवक साईनाथ बाबर यांनी व्यक्त केला. प्रचारा दरम्यान अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे मोरे यांनी दर्शन घेतले.

मिठानगर, भाग्योदयनगर, कोंढवा भागात कोपरा सभा आयोजित केल्या होत्या. त्यावेळी साईनाथ बाबर बोलत होते. वसंत मोरे, हुसेनभाई आणि माजी नगरसेविका आरती बाबर यावेळी उपस्थित होत्या. कोंढव्यातून ही विजयाची नांदी आहे. मनसेचा विजय निश्चित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुस्लीम समाज बांधवांसाठी मनसेने अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना मतदान करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. परिसरात वसंत मोरे यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. मनसेच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. 3 – 3 नगरसेवक असतानाही हज हाऊस बांधण्यात आले नाही. वसंत मोरे आमदार झाल्यावर हे काम लगेच होणार असल्याचेही साईनाथ बाबर म्हणाले.

आधी लष्करमधून कोंढवा भागाला पाणीपुरवठा होत होता. आपल्याकडे स्टोरेज क्षमता नव्हती. सुमारे 1 कोटी लिटर क्षमतेचा 2 टाक्या साईनाथ बाबर यांनी बांधल्या. त्यामुळे कोंढाव्याचा 100 टक्के पाणीप्रश्न मिटणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. कोंढवा भागात वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ते नाहीत. या भागातील आमदारांना वाहतुकीची समस्या का सोडविता आली नाही? असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला.

वसंत मोरे आमदार होणार असेल तर खरा आमदार साईनाथ बाबर होणार आहे, असे सांगताच नागरिकांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. कात्रज-कोंढवा रस्त्यावर मी 13 कोटी रुपये खर्च करून 2009 साली उड्डाणपूल बांधला. आता 10 वर्षे झाली, या रस्त्यावर 1 खड्डाही पडला नसल्याचे वसंत मोरे म्हणाले. हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगावशेरी मतदारसंघातील तिन्ही आमदार रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेस कोर्सवरील सभा रद्द केल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. 21 ऑक्टोबरला मोठ्या संख्येने रेल्वेइंजिनचे बटन दाबा. 5 वर्षांत तुम्हाला दिलेला शब्द खाली पडणार नाही, असेही मोरे यांनी निक्षून सांगितले.

दरम्यान, सोमवारी वसंत मोरे यांची महादेवनगर, मांजरी, साडेसतरानळी येथे पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शिवाजी भाडळे, पोपटराव घुले, विशाल ढोरे, निलेश टाकले, अजय जाधव सहभागी झाले होते. आज सायंकाळी 7 वा. मुंढवा येथे कोपरा सभा होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.