Pimpri : मोटारसायकल चोराला अटक; चार दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने एका मोटारसायकल चोराला अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी, निगडी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे चार गुन्हे उघड झाले आहेत.

विशाल मारुती चव्हाण (वय 32, रा. पाटीलनगर, राम मंदिराशेजारी, चिखली), असे अटक करण्यात आलेल्या मोटारसायकल चोराचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाढलेल्या वाहनचोरीवर जरब बसविण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक आज (शुक्रवारी) सकाळी चिखली परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कुदळवाडी येथील चौधरी वजन काट्यासमोर विशाल हा दुचाकीस्वार संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून संशय बळावल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चार दुचाकी चोरल्याचे कबूल केले. यावरून विशाल याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1 लाख 30 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

या कारवाईमुळे निगडी पोलीस ठाण्यातील दोन, पिंपरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, पोलीस हवालदार अप्पासाहेब कारकूड, प्रमोद वेताळ, पोलीस नाईक अमित गायकवाड, संतोष बर्गे, तानाजी गाडे, सुरेंद्र आढाव, किरण चोरगे, प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.