Vehicle Theft : वाहन चो-या दुपटीने वाढल्या अन उकल घटली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक महिन्याला वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढत होत आहे. त्याच प्रमाणात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. वाहन चोरट्यांना जेरबंद करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

घरासमोर, सोसायटीच्या पार्किंग मध्ये, दुकानासमोर, सार्वजनिक पार्किंग मध्ये, रस्त्याच्या बाजूला अशी एकही जागा शिल्लक नाही, जिथून वाहने चोरीला जात नाहीत. वाहनांचे लॉक तोडून अवघ्या काही मिनिटात वाहने चोरून नेली जातात. यामुळे शहरात सराईत वाहन चोरट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी पोलिसांनी दुचाकी वाहने चोरणा-या आंतरराज्यीय टोळ्यांना पकडले आहे. पण यामुळे वाहन चोरट्यांचा पुरेसा बंदोबस्त अद्याप झालेला नाही.

दररोज शहराच्या कोणत्यातरी भागातून दोन-चार वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस येतात. पिंपरी चिंचवड शहरातून ऑगस्ट महिन्यात दररोज सरासरी पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर दोन दिवसाला एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस येत असल्याचे आकडेवारी सांगते. पोलिसांचे नेटवर्क वाहन चोरट्यांपर्यंत अजूनही पुरते पोहोचू शकलेले नाहीत. काही गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी अगोदर एखादे वाहन चोरतात आणि त्याच वाहनाचा वापर करून गंभीर गुन्हा करतात, असेही काही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे वाहने चोरीला जाणे ही बाब तेवढ्यापुरती मर्यादित नसून पुढे गंभीर गुन्हे होण्याची देखील शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून 150 दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. त्यातील केवळ 18 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या यशाची टक्केवारी केवळ 12 टक्के आहे. मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये 90 दुचाकी चोरीला गेल्या होत्या. त्यातील 23 दुचाकी पोलिसांनी शोधल्या. हे प्रमाण 26 टक्के एवढे आहे. मागील वर्षी पेक्षा या वर्षी पोलिसांची कामगिरी निम्म्याने ढासळलेली असल्याचे आकडेवारी सांगते.

अशीच परिस्थिती जुलै महिन्यात देखील होती. जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून 136 दुचाकी चोरीला गेल्या. त्यातील केवळ 19 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे प्रमाण 14 टक्के आहे.

यावर्षी एक जानेवारी ते 31 ऑगस्ट या कालावधीत शहरातून 896 दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील 187 गुन्ह्यांची उकल पोलिसांना झाली आहे. हे प्रमाण 21 टक्के एवढे आहे. मागील वर्षी एक जानेवारी ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत शहर परिसरातून 504 दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते. त्यातील 136 गुन्हे उघडकीस आले. गुन्हे उघडकीस आणण्याचे मागील वर्षीचे प्रमाण 27 टक्के होते.

मागील वर्षीपेक्षा यावर्षी आणि दिवसेंदिवस पोलिसांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणता येईनासे झाले आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाणी स्मार्ट झाली. ए प्लस प्लस, ए प्लस आणि ए अशा तीन प्रकारात शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. पण केवळ मानांकन मिळाले म्हणजे कामगिरी सुधारली, गुन्हे कमी झाले, गुन्हेगारी संपली असा अर्थ होत नाही. त्यामुळे स्मार्ट शहरातील, स्मार्ट पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना देखील तितक्याच स्मार्टपणे गुन्हेगारी संपवावी लागेल. वाहन चोरीचे गुन्हे रोखण्याचे तर पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

वाहन चोरी विरोधी पथक केवळ नावालाच

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरात वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली वाहन चोरी विरोधी पथकाची स्थापना केली. गुन्हे शाखा युनिट चारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्याकडे या पथाकाची धुरा सोपवण्यात आली. या पथकात सर्व गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग, खंडणी विरोधी पथक अशा सर्व विभागातून दहा कर्मचारी नेमण्यात आले. दोन महिन्यांचा काळ उलटून गेला तरीही पथकाच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही. त्यामुळे वाहन चोरी विरोधी पथक केवळ नावालाच असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.