Chinchwad Crime : वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान; शहरातून दोन कार, चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकंदरीत वाहनचोर पोलिसांनाच आव्हान देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मात्र नाहक त्रास होत आहे. वाहनचोरांच्या दररोजच्या प्रतापांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरासमोर, सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली वाहने तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेली वाहने चोरट्यांचे लक्ष्य ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन कार चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजय नागनाथ दाखले (वय 36, रा. सहयोग नगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 40 हजाराची कार सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे. तर संजय भालचंद्र किरवे (वय 52, रा. बाजीराव बारणे चाळ, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांची इंडिका कार चोरट्यांनी घरासमोरून भरदिवसा चोरून नेली आहे.

जॉस मॅथियु (वय 52, रा. मोरवाडी, पिंपरी) यांची 15 हजारांची दुचाकी रचना कॉम्प्लेक्सची मागील बाजू, मोरवाडी पिंपरी येथून चोरून नेली आहे. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. गजानन गोविंदराव कुमावत (वय 38, रा. महादेव नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांची 20 हजारांची दुचाकी चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली आहे.

अशोक दादा गव्हाणे (वय 35, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गव्हाणे यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रहाटणी येथील धनगर बाबा मंदिरासमोरून चोरून नेली आहे. रजस दत्तात्रय क्षीरसागर (वय 36, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. क्षीरसागर यांची पल्सर दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलिसांनी काही वाहनचोरांना अटक करून त्यांच्याकडून बुलेट दुचाकी जप्त केल्या. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने एका अट्टल दुचाकी चोराला अटक केली. हा चोरटा नाशिक मधून येऊन पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरी करायचा. कारवाई होत असली तरीही वाहनचोरांना लगाम लावण्यात पोलीस अपयशीच ठरत आहेत. वाहनचोर भर दिवसा देखील वाहने चोरून नेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.