Chinchwad : वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनांची वाहतूक पोलिसांकडे तक्रार करायची आहे ….. मग हे वाचा

नागरिकांना करता येते बेशिस्त वाहन चालकांविरोधात तक्रारी

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असताना एखादा वाहन चालक वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवून निघून जातो. सर्वसामान्य नागरिक मात्र केवळ बघ्याची भूमिका घेऊन थांबतात. नियम मोडणा-यांना वाहतूक पोलिसांनी चांगला इंगा दाखवायला हवा. ‘मी वाहतूक पोलीस असतो तर… अशा वाहन चालकांवर तात्काळ कारवाई केली असती’ अशी मनाची समजूत घालून नागरिक निघून जातात. पण आता अशा बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडे सर्वसामान्य नागरिकांना देखील तक्रारी करता येतात.

वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यावर वाहतूक पोलीस संबंधित वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करतात. मात्र आता नागरिकही अशा बेशिस्त वाहन चालकांना दंड करू शकतात. त्यासाठी शासनाचे ‘महाट्रॅफिक ऍप’ डाऊनलोड करणे गरजेचे आहे. त्यातून नागरिक बेशिस्त वाहनांबाबत वाहतूक विभागाकडे तक्रारी करू शकतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आणण्याचा पोलिसांचा मानस आहे.

मागील दहा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातील 465 नागरिकांनी या ऍपच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीची पडताळणी करून वाहतूक पोलिसांनी 346 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 112 नागरिकांनी केलेल्या तक्रारीमध्ये वाहनांचा क्रमांक व फोटो व्यवस्थित न आल्याने त्यांच्यावर कारवाई करता आलेली नाही. यातील 18 जणांनी आत्तापर्यंत दंड भरला असून सात जणांवर कारवाई करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तर 328 जणांकडून दंड वसूल करणे बाकी आहे.

मागील वर्षी 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमध्येही 121 नागरिकांनी बेशिस्त वाहन चालकांबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी 74 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांची अशी करा तक्रार

आपल्या फोनमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन Maha Traffic app डाऊनलोड करा. हे ऍप्लिकेशन सुरू करण्यापूर्वी एक ओटीपी क्रमांक आपल्या मोबाइलवर येईल. तो टाकल्यानंतर हे ऍप्लिकेशन कार्यान्वित होईल. हे ऍप्लिकेशन उघडल्यानंतर सहा मोठे आयकॉन येतील. त्यापैकी Civilian Report या आयकॉनवर क्‍लिक करा. त्यानंतर Violation Report या आयकॉनवर गेल्यावर आणखी आठ आयकॉन दिसतील.

त्यामध्ये ट्रीपल सीट, नो हेल्मेट, नो सीटबेल्ट, स्टॉप लाइन, मोबाईल टॉकिंग, नो पार्किंग, फॅन्सी नंबर प्लेट किंवा इतर अशी आयकॉन येतील. ज्या नियमांचे उल्लंघन वाहन चालकाने केले आहे त्या आयकॉनवर क्‍लिक करून त्याचा फोटो अपलोड करावा. तसेच त्यासोबत गाडीचा क्रमांकही टाकावा. एकावेळी संबंधित वाहनाचे तीन फोटो अपलोड करता येतील.

ट्विटर वरूनही पिंपरी-चिंचवड पोलीस करतात बेशिस्त वाहनांवर कारवाई

पिंपरी चिंचवड पोलिसांचे @PCcityPolice हे व्टिटर अकाऊंट आहे. या अकाऊंटवरही बेशिस्त वाहन चालकांबाबत तक्रारी येत असतात. या तक्रारी वाहतूक शाखेच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतात. आलेल्या तक्रार आणि फोटोची खातरजमा करून वाहतूक पोलीस बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.