Veteran actress Ashu passes away – ज्येष्ठ अभिनेत्री आशू यांचे निधन

एमपीसी न्यूज – एकेकाळी हीट अँड हॉट नाटकातून भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे (वय 75) किडनीच्या विकाराने  बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले.

त्यांच्यामागे पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (17 सप्टेंबर) वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ललिता देसाई यांचा जन्म 21 जानेवारी 1945 रोजी झाला. ‘कामापुरता मामा’ या चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. मात्र आचार्य अत्रे यांच्या ‘ब्रह्मचारी’ नाटकात त्यांनी रंगवलेल्या बोल्ड अशा किशोरी या व्यक्तिरेखेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.  त्यानंतर ‘गुंतता हदय हे’, ‘नाथ हा माझा’, ‘अपराध मीच  केला’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘अभिलाषा’, ‘मॅडम’  या नाटकांतून त्यांनी काम केले.

मराठी रंगभूमी व  चित्रपटांबरोबरच त्यांनी ‘कब, क्यों और कहा’, ‘अमर प्रेम’, ‘संतान’, ‘सीता और गीता’, ‘अनुराग’, ‘यादो की बारात’ या हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या.  रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेकडून ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.