Shrikant Moghe passes away : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज : मराठी ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. ६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अभिनेते शंतनू हे चिरंजीव आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. मोघे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत कवी सुधीर मोघे त्यांचे कनिष्ठ बंधू होत.

एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, ‘वाऱ्यावरची वरात’मध्येच ‘दिल देके देखो’ या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती.

सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे ६ नोव्हेंबर १९२९ रोजी त्याचा जन्म झाला होता. श्रीकांत मोघे हे नाटय़, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता याबरोबरच ते चित्रकार व वास्तुविशारद, उत्तम सुगम संगीत गायकही होते. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे यांचे वडील कीर्तनकार होते.

श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बी.एस्‌‍सी साठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले.

महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले  होते. तसेच, त्यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.