Veteran Actress Kumkum Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

Veteran actress Kumkum passes away कुमकुम यांनी १९५४ साली ‘आरपार’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘मिर्झा गालिब’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘फंटूश’, ‘सीआयडी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

एमपीसी न्यूज – ‘मधुबन में राधिका नाचे रे’, ‘कभी आर कभी पार’, ‘ऐ दिल हैं मुष्किल’ यासारख्या सदाबहार गाण्यांना आपल्या अभिनयाने सजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे मंगळवारी निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. आरपार, सीआयडी, कोहिनूर, ललकार, आंखे यासारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. दिवंगत अभिनेते जगदीप यांचा मुलगा नावेद जाफरी यांनी ट्विटद्वारे त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

नावेद यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘आम्ही आणखी एक रत्न गमावले आहे. मी त्यांना लहानपणापासूनच ओळखत होतो आणि त्या आमच्या कुटुंबातीलच एक होत्या. एक उत्तम कलाकार आणि एक महान व्यक्ती. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो’, असे ट्विट त्यांनी केले आहे.


अभिनेते जॉनी वॉकर यांचा मुलगा नासिर खानने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कुमकुम यांना श्रद्धांजली वाहिली. ‘गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री कुमकुम यांचे निधन, त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक चित्रपट, गाणी, नृत्य सादर केले, जे त्यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. माझे वडील जॉनी वॉकर यांच्यासमवेत त्यांनी बरेच चित्रपट केले होते. #प्यासा आणि #सीआयडी हे त्यापैकी दोन गाजलेले चित्रपट आहेत’, असे नासिर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.


मूळच्या बिहारमधील राजघराण्यातील असलेल्या कुमकुम यांचे खरे नाव झेबुन्निसा असे होते. त्यांना गुरुदत्त यांनी चित्रपटातून ब्रेक दिला. कुमकुम या कुशल कथ्थक नर्तिका होत्या. त्यांनी पहिली भोजपुरी फिल्म ‘गंगामैया तोहे पिअरी चढावे’ यामध्ये देखील काम केले होते.

हिंदी चित्रपट रसिकांना मात्र त्या एक नृत्यकुशल अभिनेत्री म्हणून परिचित होत्या. लग्नानंतर त्या सौदी अरेबियामध्ये गेल्या होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून त्या मुंबईमध्ये राहत होत्या.

कुमकुम यांनी १९५४ साली ‘आरपार’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘मिर्झा गालिब’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘फंटूश’, ‘सीआयडी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

मात्र ‘नया दौर’, ‘मदर इंडिया’, ‘कोहिनूर’, ‘सन ऑफ इंडिया’, ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ५०-६०चं दशक त्यांनी आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर गाजवलं होतं. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.