Thane: ज्येष्ठ सिनेपत्रकार ललिता ताम्हणे यांचे निधन

Veteran film journalist Lalita Tamhane passes away

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे शनिवारी ठाण्यात कर्करोगाने निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती विधिज्ञ विनीत रणदिवे, मुलगी सोनल आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

काही वर्षांपूर्वी ललिता ताम्हणे यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. मात्र कर्करोगाशी लढतानाही त्यांनी लेखन सुरुच ठेवले होता. परंतु, शनिवारी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली.

कायम प्रसन्न चेहरा आणि हसरे व्यक्तिमत्व ही त्यांची ओळख होती. त्यांचे बोलणे अत्यंत अकृत्रिम होते. चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात त्यांचे अत्यंत साधे व्यक्तिमत्व छाप टाकून जात असे.

ललिता ताम्हणे यांनी ‘चित्रानंद’ मासिकातून सिनेपत्रकारितेला सुरुवात केली. त्या वेळची सिनेपत्रकारिता ही केवळ कलाकारांच्या गॉसिप स्वरुपाच्या बातम्या देण्यापुरती मर्यादित होती.

मात्र ललिता ताम्हणे यांनी या क्षेत्रात पदार्पणापासूनच वास्तव आणि सत्य घडामोडींवर लिखाण केले आणि आपला वेगळा ठसा उमटवला.

‘चित्रानंद’नंतर त्या विद्याधर गोखले यांच्या ‘चित्ररंग’मध्ये मुक्त पत्रकार म्हणून लिहू लागल्या. त्यानंतर त्यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकमुद्रा’ पुरवणीचे संपादन केले.

वृत्तपत्रातील नोकरी सोडल्यावर त्या प्रसाद महाडकर यांच्या ‘जीवनगाणी’ या संस्थेशी जोडल्या गेल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘स्मिता, स्मितं, मी’ हे स्मिता पाटील यांच्यावरील ‘नूतन, असेन मी…नसेन मी’हे नूतन यांच्यावरील, ‘तें’ची ‘प्रिया’ हे प्रिया तेंडुलकर यांच्यावरील पुस्तके विशेष गाजली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.