Pune: ज्येष्ठ साहित्यिक ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन

एमपीसी न्यूज – जेष्ठ साहित्यिक ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे (वय 78) यांचे दीर्घ आजाराने आज (रविवारी) सकाळी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. 

उत्तम बंडू तुपे यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.

उत्तम बंडू तुपे यांचा जन्म एक जानेवारी 1942 रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या एनकूळ या गावी झाला होता. १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथा लिहिणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी विशेष गाजली. यामुळेच त्यांना ‘झुलवाकार’ नावाने ओळखले जात होते. कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाल, झावळ आणि माती या कादंबऱ्याही गाजल्या. त्यांच्या ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार मिळाला होता. त्याच बरोबर ‘काट्यावरची पोट’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांचा जीवन प्रवास अखेरपर्यंत खडतर राहिला. मागील अनेक महिन्यापासून ते पक्षाघाताने आजारी होते.

ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी तुपे यांच्या ‘झुलवा’ कादंबरीवर आधारित नाटक रंगभूमीवर आणले होते. त्यात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या. 1997 साली जळगावमध्ये भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार, तसेच त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता.

इजाळ (कादंबरी), खाई (कादंबरी), खुळी (कादंबरी), चिपाड (कादंबरी), झावळ (कादंबरी), झुलवा (कादंबरी), भस्म (कादंबरी), लांबलेल्या सावल्या (कादंबरी), शेवंती (कादंबरी), संतू (कादंबरी), आंदण (लघुकथा संग्रह), पिंड (लघुकथा संग्रह), माती आणि माणसं (लघुकथा संग्रह), कोबारा (लघुकथा संग्रह), काट्यावरची पोटं (आत्मचरित्र) हे उत्तम बंडू तुपे यांचे मराठी साहित्यातील योगदान आहे.

अण्णाभाऊंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा सिद्धहस्त, संवेदनशील साहित्यिक हरपला – अजित पवार

 

समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केले. त्यांच्या निधनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा महान साहित्यिक हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तम तुपे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणाले की, अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले. कादंबरी, लघुकथा, नाटक, आत्मकथन अशा अनेक माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाच्या व्यथा-वेदना, जीवन त्यांनी प्रामाणिकपणे मांडल्या. ‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचं आत्मचरित्र समाजातल्या वंचित उपेक्षित घटकांचे प्रतिनिधित्व करणारं आहे. त्यात कमालीचा प्रामाणिकपणा आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या दाहक वेदना-व्यथा चित्रित आहेत. त्या चित्रणात वास्तवता, सचोटीची अनुभूती आहे. जीवनसंघर्षाचे वर्णन आहे. ‘झुलवा’ कादंबरीने त्यांना स्वतंत्र ओळख दिली. आज उत्तम तुपे यांच्या निधनाने सिध्दहस्त, संवेदनशील साहित्यिकाला आपण मुकलो आहे, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.