India vs England : भारत-इंग्लंड मालिकेचा विजयी समारोप

एमपीसी न्यूज : ( विवेक दिगंबरराव कुलकर्णी ) सॅम करनने मारलेल्या शेवटच्या फटक्यावर एकच धाव मिळाली आणि विराट कोहलीसह तमाम भारतीय रसिकांनी हुश्श करत मालिका विजयाचा आनंद घेतला.

पहिल्यादा कसोटी,मग 20-20 आणि आता एकदिवसीय मालीका जिंकत भारतीय संघाने विश्वविजेत्या आणि क्रिकेटच्या जनकाचा म्हणजेच साहेबांचा पराभव करत मायदेशातली विजयी कामगिरी कायम ठेवली.

शेवटच्या चेंडूपर्यत अटीतटीच्या लढतीचा थरार अनुभवता आला,रक्तदाब असलेल्यांचे काय झाले असेल, ते त्यांनाच ठावूक, पण खणखणीत तब्बेत असलेल्यांचे सुद्धा आज बीपी खूपदा हाय झाले असेल हातात असलेल्या सामन्यात आपणच काशी करून टीमचे मनोबल खच्ची करण्यात भारतीय संघाचा हात आज तरी जगात कोणीही धरू शकणार नाही, खरंय की नाही?

पहिल्यांदा सलामीला जबरदस्त खेळी करत असताना अचानकपणे रोहित गेला, मग आल्या आल्या विराटही गेला,जम बसलेल्या गब्बरनेही संघाची नैय्या मध्येच भोवऱ्यात सोडली आणि दोन्ही एकदिवसीय सामन्यात उत्तम खेळणारा राहुल पण गेला तरीही धावगती 8 ते 9 प्रती षटक होती, आणि त्यात जोडी जमली हार्डेस्ट हीटर मानले जाणारे रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी कसलेली आणि घणाघाती फलंदाजी करत कुठलेही दडपण न घेता भागीदारी जमवली, फुलवली आणि अशी फुलवली की आपण 360 ते 380 रन्स सहज करणार, अशी आशा वाटायला लागली आणि इथेच घात झाला.

जम बसल्यावर पंत बाद झाला आणि थोड्या वेळातच हार्दिक सुद्धा, अचानकपणे अशी पडझड झाल्यावर तीनशे तरी होतील का आणि मागच्याच सामन्यात इंग्लंड संघाने ज्या पद्धतीने आपल्याला हरवले होते, ते बघता ते पुरतील का, ही आशंका मनाला भेडसावत होती, पण मुंबईकर ठाकूर ने कृणाल पंड्या सोबत भागीदार करत संघाला तीनशे एकोणतीसची बऱ्यापैकी आश्वासक धावसंख्या गाठून दिली.

तीनशे तीसचे लक्ष तेही निर्णायक सामन्यात कधीही सोपे नसते, त्यात आपल्याकडे भुवी, ठाकूर आणि यॉर्कर किंग नटराजन असतांना, त्यात भुवीने इंग्लंड संघाला सुरुवातीलाच धक्के दिले आणि ठाकूरने सुद्धा तीन बळी घेत इंग्लंड संघाला मागे ढकलले असे वाटत असतानाच सॅम करनने आधी रशीद, मग मोईन खान आणि नंतर मार्क्स वुडला सोबत घेऊन त्याच्या आयुष्यातली सर्वोच्च आणि सर्वोत्तम खेळी करत सामनावीराचा मानकरी तर झालाच अन रसिक भारतीय प्रेक्षकांनासुध्दा आपलेसे करून घेतले.

त्यात आपली फिल्डिंग आज फारच दयनीय होती, हातातले झेल सोडत भारतीय क्षेत्ररक्षकांनी इंग्लंडला बऱ्यापैकी मदत केली आणि आपल्या संघाचे आणखीच दडपण वाढवले, एक वेळ तर अशी आली होती की तो शतक तर करणारच पण भारताला भारतातच हारवणार, असे वाटायला लागले होते, पण थँक्स टू भुवी आणि हार्दिक पंड्या (49 वे षटक टाकताना हार्दिकने फक्त चारच धावा दिल्या आणि जवळपास दोन्हीही फलंदाजाला बाद केले होते पण ठाकूर आणि नटराजनने ऐनवेळी झेल सोडले पण तरीही सामना आपल्या बऱ्यापैकी हातात आला होता.

कारण शेवटच्या सहा चेंडूत त्यांना पंधरा धावा करायच्या होत्या आणि समोर नटराजन होता ज्याचे यॉर्कर फारच भेदक असतात, त्याने या अल्पावधीतच कमावलेल्या विश्वासाला पात्र ठरत  सामना आणि मालिका जिंकून देत कोहलीच्या खात्यात आणखी एक मालिका विजय मिळवून दिला.

महत्वाचे म्हणजे कोहलीने कर्णधार म्हणून 200  सामन्यांत 152 विजय मिळवून विक्रमी कर्णधार म्हणून पंटर (तोच हो पोंटिंग ला) मागे टाकले.

तिन्ही  फॉरमॅटमध्ये इंग्लंड संघाला हरवण्याचा भीम पराक्रम करणाऱ्या संघाच्या काही कमकुवत बाजू इतर संघाला कळल्या असल्यातरी त्यावर नंतर बोलू! आता हा आंनद उपभोगणे जास्त गरजेचे आहे, am i right friends?

भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.