Victory Day Parade: विजय दिवसानिमित्त मॉस्कोत शानदार परेड, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थिती

Victory Day Parade: A grand parade in Moscow on the occasion of Victory Day, special presence of Defence Minister Rajnath Singh

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) – पहिले आणि दुसरे महायुद्ध हा आंतरराष्ट्रीय इतिहासाचा एक न टाळता येणारा भाग आहे. पहिल्या महायुद्धाची जखम घेऊन हिटलरने जर्मनीच्या अस्मितेसाठी दुसरे महायुद्ध लढले. पण त्याच्या दुर्दैवाने आणि दोस्त राष्ट्रांच्या सुदैवाने या युद्धात हिटलरचा सपशेल पराभव झाला. त्यामुळे जगभरातील लोक स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकले. अर्थात त्याच्या न टाळता येणा-या असंख्य खुणा आजही जगात अस्तित्वात आहेत.

आज मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये भव्य परेडचे आयोजन करण्यात आले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी या परेडचे निरीक्षण केले. यावेळी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विशेष उपस्थित होते. दुस-या महायुद्धाच्यावेळी भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. त्यामुळे त्यांच्यावतीने अनेक भारतीय सैनिक दुस-या महायुद्धात लढले होते. त्यामुळे यावेळी भारताला देखील आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या चीनच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी आणि भारताला आणखी शस्त्रसज्ज करण्यासाठी रशियाकडून S -400 ही अँटीमिसाइल डिफेन्स सिस्टीम लवकर देण्याची मागणी करण्यासाठी राजनाथ सिंह खास तेथे गेले आहेत.

सुमारे 90 मिनिटे चाललेल्या या परेडमध्ये 19 इतर देशांचे प्रतिनिधी या हजर होते. त्यात चीनचे संरक्षणमंत्री देखील होते, पण सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांमध्ये बातचीत होणार नाही. मॉस्कोमधील परेडमध्ये 14 हजार सैनिक सहभागी होते. तसेच रशियातील इतर 27 शहरातील परेडमध्ये 50 हजार सैनिक संचलन करतील. या परेडचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे सर्व सैनिकांच्या चेह-यावर विजयी हास्य होते. कारण अर्थातच विजयदिन साजरा करण्यासाठी ही परेड होती.

दुस-या महायुद्धाच्या समाप्तीला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. नाझी क्रूरकर्मा हिटलरने 30 एप्रिल रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे त्यानंतर 7 मे रोजी दोस्त सैन्याचा विजय झाला, असे घोषित करण्यात आले. त्यामुळे युरोपातील बहुसंख्य देश 8 मे हा विजय दिवस म्हणून साजरा करतात. पण रशियामध्ये 9 मे रोजी विजय दिवस साजरा केला जातो. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हा दिवस 24 जून रोजी साजरा करण्यात येत आहे. दोस्त राष्ट्रांचा विजय झाल्यानंतर 9 मे रोजी विजय दिवस साजरा झाल्यावर सोव्हिएट रशियाचे तेव्हाचे अध्यक्ष स्टालिन यांना त्यानिमित्ताने भव्य परेडचे आयोजन करायचे होते. तेव्हा त्यांनी 24 जून रोजी आर्मी, नेव्ही, आणि मॉस्को गॅरिसनची विजयी परेड मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये आयोजित केली. त्यामुळे रशियामध्ये यंदा हा विजय दिवस 24 जून रोजी साजरा केला जात आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर 2019 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 9 मे रोजी होणा-या  विजय दिन उत्सवासाठी आमंत्रित केले होते. पण पंतप्रधान मोदी मॉस्कोला जाऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी पुतीन यांना शुभेच्छा दिल्या: “विजय दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत आज रशियाच्या पाठीशी उभा आहे. दुस-या विश्वयुद्धातही हजारो भारतीय सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले. याप्रसंगी अध्यक्ष पुतीन आणि रशियन लोकांना माझे हार्दिक अभिवादन”, असे मोदी यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.