Pimpri News: ‘ई-कचऱ्याबाबत’ प्रशासनाने योग्य पाऊले उचलावीत – विकास डोळस

एमपीसी न्यूज – वाढत्या शहरीकरणासोबतच उद्योगनगरीत पर्यावरणाची समस्या गंभीर होत चालली आहे. इलेक्ट्रॅनिक कंपन्या व त्यासंबंधी व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शिवाय, विविध आजारांमुळे मेडिकल क्षेत्राचेही प्रमाण वाढले आहे, त्यामुळे जैविक व ई –कचऱ्याची प्रचंड प्रमाणात निर्मिती होत आहे. परंतु, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत महापालिका प्रशासनाकडून अवलंबली जात नाही. या समस्यांकडे गांभीर्यांने पाहिले जात नाही, त्यामुळे शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लवकरात – लवकर ई-कचऱ्याबाबत योग्य पावले उचलावीत, अशी मागणी भाजप नगरसेवक विकास डोळस यांनी केली.

याबाबत महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांना निवेदन दिले आहे. नगरसेवक विकास डोळस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, ई-कचऱ्याबाबत महापालिकेने 2014 मध्ये मोबाईल व्हॅन सुरु करण्याचा प्रयोग केला होता. एका महिन्यातच हा प्रयोग अयशस्वी झाला. त्यानंतर मात्र ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही.

शहरात अनेकजण उच्चशिक्षित आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेकजण कामाला आहेत. अनेकांकडे मोबाईल, संगणक अशा वस्तू आहेत. या वस्तू नादुरूस्त होतात, अशा वेळी हा ई-कचरा कुठे जमा करायचा हा प्रश्न अनेक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन उदासिन असल्याचे चित्र पहायला मिळते आहे.

ई-कचरा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी देखील घातक आहे. त्यांच्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. ई-कचऱ्यामुळे कचरा डेपोमध्ये आगी लागण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

काही सामाजिक संस्था ई-कचरा गोळा करण्याचे छोटे मोठे उपक्रम घेत असतात पण ते 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन ई-कचरा कुठे जमा करायचा, त्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत जनजागृती करून, योग्य पाऊले उचलावीत आणि याबाबतच्या उपाययोजनांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करावा अशी मागणी नगरसेवक डोळस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.