Bhosari : वीस वर्ष डावललेल्या समाविष्ट गावांत वाहिली आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विकासगंगा – संतोष लोंढे

एमपीसी न्यूज – गेल्या 20 वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील आरक्षणांचा विकास झाला नव्हता. तसेच, महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या. परिणामी, चिखली, मोशी, दिघी, चर्‍होली, डुडूळगाव, तळवडे या गावांतील विकासाचा वेग मंदावला होता. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांच्या विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण केले असून अनेक महत्वाची कामे या भागात सुरु आहेत, असे मत नगरसेवक संतोष लोंढे यांनी व्यक्त केले.

नगरसेवक संतोष लोंढे म्हणाले, “2017 साली झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यश मिळाले. समाविष्ट गावांचे योगदान लक्षात घेत भाजपाचे पहिले महापौर म्हणून चर्‍होलीचे नगरसेवक नितीन काळजे यांना संधी मिळाली. यापूर्वीच कधीही शहर पातळीवर समाविष्ट गावाला प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. त्यानंतर महापौरपदी चिखली-जाधववाडीचे राहुल जाधव यांना संधी मिळाली. त्यानंतर समाविष्ट गावांचे प्रतिनिधीत्व करणारे दोन नगरसेवक क्रीडा समिती सभापती, एक महिला व बालकल्याण सभापती, तीन नगरसेवकांची स्थायी समितीवर निवड करण्यात आली. त्यामुळे महापालिकेत भाजपाच्या कार्यकाळात सर्वाधिक संधी समाविष्ट गावांतील लोकप्रतिनिधींना मिळाली आहे.

समाविष्ट गावांत अनेक सुविधांची वाणवा होती. रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वाधिक भर देण्यात येत आहे. त्यासाठी विकास आराखड्याप्रमाणे समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून ‘भोसरी व्हीजन-2020’ मधील बहुतांशी प्रकल्प समाविष्ट गावांत सुरु आहेत.

प्रशांत फुगे म्हणाले, “राज्य शासनाने 11 सप्टेंबर 1997 मध्ये पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगत असणारी 14 गावे महापालिकेत समाविष्ट केली. समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार होण्यासाठी 2009 साल उजाडले. पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांवर 20 वर्षांपासून अन्याय होत होता. तो अन्याय दूर करण्याचा ‘शब्द’ आमदार महेश लांडगे यांनी या परिसरातील नागरिकांना दिला. या भागात उद्यान, दवाखाने, अग्निशमन केंद्र सुरु झाले असून रस्त्यांची कामे सुरु होत आहेत. आगामी काळात पालिकेतील या समाविष्ट गावांत रस्ते, मुबलक पाणी, उड्डाण पूल, क्रीडांगणे, उद्याने विकसित होणार आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या इतर परिसराचा ज्या पद्धतीने विकास झाला आहे. त्याच पद्धतीने समाविष्ट गावांचा विकास करुन कायापालाट होणार असल्याचा विश्वास आम्हाला आहे.

समाविष्ट गावातील पहिल्या टप्प्यातील 90 कोटींच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामांमध्ये मोशी येथील गट क्रमांक 57 ते 61 पर्यंतचा 18 मीटर डीपी रस्ता, शिवाजीवाडी ते मोशी, मोशी आळंदी रस्ता ते इंद्रायणी नदी (केळगाव पुलापर्यंतचा) 18 डीपी रस्ता डुडुळगाव, च-होली पठारे मळा, डी वाय पाटील कॉलेज विकास आराखड्यातील 30 मीटर रुंदीच्या रस्त्याचे उर्वरित (पूर्व पठारे मळा, च-होली) च-होली मुख्य रस्ता, दाभाडे वस्ती ते इंद्रायणी नदीपर्यंतचा 45 मीटर रुंद रस्ता, पुणे आळंदी रस्ता ते दाभाडे वस्ती येथील 30 ते 45 मीटर डीपी रस्ता विकसित करणे आझादनगर च-होली या कामांहंस सुरुवात करण्यात आली असल्याचेही फुगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.