Vikasnagar News : खासगी शाळांकडून शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सवलत; युवा सेनेला लेखी पत्र

एमपीसीन्यूज : शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह फी अभावी विद्यार्थ्यांना व्हॉटसअप ग्रुपमधून काढू नये, या युवा सेनेच्या मागणीला किवळे विकासनगमधील खासगी विनाअनुदानित शाळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. याबाबत विस्डम स्कूलच्यावतीने युवा सेना उप शहर अधिकारी राजेंद्र तरस यांना लेखी पत्र देऊन विद्यार्थी आणि पालकांना ट्युशन फीमध्ये 50 टक्के सवलत दिली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना तरस म्हणाले, देहूरोड परिसरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून मनमानी फी आकारणी करीत आहेत. थकीत फी असलेल्या विद्यार्थ्यांना व्हॉटसअप ग्रुपपमधील काढून टाकले जात असल्याची तक्रारी आल्या होत्या. कोरोना आणि लॉकडाउनमुळे काही संस्थानी ऑनलाईन शिक्षण चालू ठेवलेले आहे. काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे अनेक पालक हवालदिल झाले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार ट्यूशन फी व्यतिरिक्त अवांतर कोणतेही शुल्क शाळांना आकारता येणार नाही तसेच नवीन फीवाढ करता येणार नाही. तरीही काही संस्था मनमानी करीत असल्याच्या तक्रारी पालक वर्गाकडून करण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झालेले आहे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करावे. शैक्षणिक संस्थांनी फी सवलतीसह फीचे समान हप्ते करून द्यावेत, अशी मागणी राजेंद्र तरस यांनी विकासनगरमधील विस्डम, सेंट जोसेफ आणि विब्स रिपब्लिक स्कूल व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली होती.

तसेच या मागणीसाठी युवा सेना विस्तारक राजेश पळसकर, जिल्हा समन्वयक अनिकेत घुले आणि शहर अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली  तरस यांनी सातत्याने पाठपुरावाही केला.अखेर युवा सेनेच्या मागणीला या शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

विकासनगर मधील विनाअनुदानित शाळांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. कोरोना महामारीने सर्वसामान्यांसह शाळांची परिस्थितीही नाजूक आहे. अशा परिस्थितीत मनाचा मोठेपणा दाखवत फीमध्ये 50 टक्के सवलत देणे ही खरी सामाजिक बांधिलकी आहे. या शाळांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी महापालिका आणि शासन स्तरावर निश्चित प्रयत्न केले जातील. राजेंद्र तरस : युवा सेना उप शहर अधिकारी, पिंपरी चिंचवड.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.