Vikasnagar News : कोरोना मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचे कार्य महान : बाळासाहेब ओव्हाळ

एमपीसीन्यूज : कोरोना पॉझिटिव्ह म्हटले तरी लोक दूर पळतात. जवळचे असो किंवा नातलग असो कुणीही साधी विचारपूस करायलाही येत नसल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर रक्ताचे नाते असलेली जिवाभावाची माणसेही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत. मात्र, अशा जीवघेण्या कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या सर्वधर्मीय नागरिकांवर स्वतःचा जीव धोक्यात घालून श्रीजित रमेशन आणि त्यांचे सहकारी अंत्यसंस्कार करीत आहेत. त्यांचे हे कार्य खरोखरच माणुसकी जपणारे महान कार्य आहे, अशा शब्दांत नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी कोविड योद्धयांचा गौरव केला.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या पुढाकारातून कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रीजीत रमेशन, के. पी. ॲडम आणि मंगेश पोडाला यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या प्रभाग 16 मधील गोरगरीब, गरजू नागरिक आणि रिक्षा चालक, अशा दोनशे जणांना नगरसेवक ओव्हाळ आणि श्रीजीत रमेशन, सुरेश नायर यांच्या हस्ते मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भाजप पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सुरेश नायर, भाजप महिला मोर्चाच्या शहर सचिव अलका पांडे, प्रभाग अध्यक्ष रोहित ओव्हाळ, महिला मोर्चा प्रभाग अध्यक्षा निशा येवले, युवा मोर्चाचे प्रभाग अध्यक्ष मनोज थोरवे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ ओव्हाळ, रोहित सरनोबत, मुकुंद माने निवेदिता पाटील, चंद्रिका कनक, संगिता कुवर, विद्या अल्हाट, रेश्मा पाटील, तबस्सुम किल्लेदार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक ओव्हाळ पुढे म्हणाले, कोरोना आणि लॉकडाउनमुळे वर्षभर नागरिक आर्थिक विवंचनेत आहेत. गेल्यावर्षी सुद्धा गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. या वर्षीही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे गरजू नागरिकांना शक्य ती मदत करीत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करणे याला कायम प्राधान्य राहील.

सूत्रसंचालन रवींद्र कदम यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.