Vikasnagar News : किवळेगावच्या पितापुत्रानी जपले पक्ष्यांविषयी आपुलकीचे नाते ; पक्ष्यांसाठी राखली पाऊण एकरातील ज्वारी

एमपीसी न्यूज : वाढते शहरीकरण आणि वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्ष्यांना अन्नधान्य व पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. सध्या शहरी भागासह लगतच्या ग्रामीण भागातही सिमेंट क्रॉंकिटचे जंगल उभे राहू लागले आहे. परिणामी पक्ष्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील किवळे गावच्या पितापुत्राने पक्ष्यांच्या खाद्याची व्यवस्था होण्यासाठी ज्वारीचे पिक राखले आहे. त्यांनी पक्ष्यांविषयी जपलेल्या या आपुलकीच्या नात्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

विकासनगर येथील दांगट वस्ती येथील संजय दांगट आणि सृजन दांगट अशी या पक्षीप्रेमी पितापुत्राची नावे आहेत. संजय दांगट हे वृक्षप्रेमी म्हणून परिचित आहेत. घराजवळच त्यांची शेती आहे. आजूबाजूला अनेक इमारती उभ्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांना त्यांच्या शेतातून अन्न उपलब्ध होत आहे.

उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी, अन्न आणि निवार्‍याची व्यवस्था करणे गरजचे आहे. सध्या उन्हाळा सुरु झाल्याने पक्ष्यांची पाण्यासाठी धडपडही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय आणि सृजन या पितापुत्रानाने त्यांच्या शेतातील तब्बल पाऊण एकर ज्वारी पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होण्यासाठी राखून ठेवली. शेतात विहीर असल्याने पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था झाली आहे.

आजूबाजूला अनेक इमारती आणि बंगले आहेत. तरीही दांगट यांच्या शेतात दररोज असंख्य पक्षी ज्वारीवर पोटपूजेसाठी येत असतात. पारवा, चिमण्या, पोपट, कबुतरे तसेच अन्य विविध पक्षांचे थवे येथे येत असल्याचे पाहायला मिळते. पक्षांचा राबता सुरु झाल्याने त्यांच्या किलबिलाटाने वेगळे समाधान मिळत असल्याची भावना संजय आणि सृजन यांनी व्यक्त केली.

वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्यासह त्यांच्या खाद्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पक्ष्यांना खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले घर, बाग, रस्ता, ऑफिसेस, सार्वजनिक ठिकाणी, बागेत सावलीत एखादी कुंडी किंवा पाण्यासाठी एखादे पसरट भांडे ठेवावे. सोबत घरात उरलेले अन्न ठेवल्यास पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.

संजय दांगट ( पक्षीप्रेमी -किवळे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.