Vikasnagar News : किवळे, विकासनगर येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु करा : राजेंद्र तरस यांची मागणी

एमपीसीन्यूज : जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील नागरिकांच्या सोयीसाठी विकासनगर आणि किवळेगावात कोरोना लसीकरण सुरु करण्याची मागणी शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत तरस यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना लसीकरण सुरु आहे. सध्या जेष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.

मात्र, विकासनगर, किवळे याठिकाणी सध्या एकही लसीकरण केंद्र नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना लसीकरणासाठी चिंचवडगावातील तालेरा रुग्णालय किंवा पिंपरी येथील वायसीएम रुग्णांलयात जावे लागत आहे.

या दोन्ही ठिकाणी लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. शिवाय सध्या उन्हाळाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे जेष्ठांना उष्ण झळांचा त्रासही होत आहे.

सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना चिंचवडगाव किंवा पिंपरी येथे लसीकरणासाठी जाण्याकरिता दोन ते तीन ठिकाणी वाहने बदलावी लागत आहेत. त्यामुळे संपूर्ण दिवस लसीकरणासाठी घालावावा लागत आहे. जेष्ठ नागरिकांना होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी विकासनगर आणि किवळेगावातील महापालिका शाळेत कोरोना लसीकरण सुरु करण्याची मागणी तरस यांनी निवेदनात केली आहे.

याबाबत राजेंद्र तरस म्हणाले, विकासनगर आणि किवळे गावात ज्येष्ठ नागरिक व 45 पेक्षा जास्त वय असलेले नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा कोरोनाची भीती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विकासनगर आणि किवळे येथे कोरोना लसीकरण सुरु होणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.