Vikasnagar News : … विठुरायाचरणीच ठेवला विठ्ठलभक्ताने देह

एमपीसीन्यूज : विठ्ठल हाच त्यांचा ध्यास नि श्वास. विठ्ठलभक्तीत सदैव तल्लीन असलेल्या या ज्येष्ठ वारकऱ्याने आपला देहही अखेर लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत असताना विठ्ठलचरणीच ठेवला. किवळे-विकासनगर येथील विठ्ठल मंदिरात हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.

लक्ष्मण सहादू दांगट ( वय 70), असे मृत्यू झालेल्या विठ्ठल भक्ताचे नाव आहे. दांगट हे किवळे-विकासनगर येथील दांगट वस्ती येथे राहत होते. तिथे असलेल्या विठ्ठल -रुख्मिणी मंदिरात ते नित्य नेमाने सकाळी विठ्ठल रुख्मिणीच्या दर्शनासाठी जात होते.

5 डिसेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात गेले. विठ्ठलाला गंध लावून स्वतःलाही गंध लावला. दर्शनासाठी त्यांनी विठ्ठल रुख्मिणीसमोर माथा टेकवला आणि त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला.

हा प्रकार घडला तेव्हा मंदिरात कुणीही नव्हते. काही वेळाने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी दांगट यांना रुग्णालयात नेले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दांगट यांच्या आयुष्यभराच्या पुण्याईमुळेच विठ्ठलाच्या चरणी त्यांना देवाज्ञा झाल्याची भावना परिसरातील वारकरी संप्रदायातून व्यक्त केली जात आहे.

लक्ष्मण दांगट यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, असा परिवार आहे. वृक्षप्रेमी संजय दांगट यांचे ते वडील, तर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख रोहिदास दांगट आणि छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी दांगट यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.