Vikram Gokhale : महाराष्ट्राचा ‘बॅरिस्टर’ गेला!

एमपीसी न्यूज (पं.विनोदभूषण आल्पे) : एखादा मोठा कलाकार जातो, त्या वेळी (Vikram Gokhale) त्याच्या अनेक कलाकृती डोळ्यासमोर तरळू लागतात. त्यातून त्याचा प्रत्यक्ष सहवास जर लाभला असेल तर ते किस्सेही आठवू लागतात. मी गायनाचे कार्यक्रम करू लागल्यापासूनच आमचा परिचय होता नि नंतर दोस्तीच झाली होती. एकदा तर नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने दिल्लीत आम्ही एकत्र आलो होतो. त्याच ‘बॅरिस्टर’ नाटक होतं आणि मी ‘अभिज्ञान शाकुंतल’ या विजया मेहता दिग्दर्शित नाटकात गात होतो. दोन्ही नाटकं गोवा हिंदू असो.ची असल्यामुळे हा योग आला होता.

दौऱ्यात जशा गप्पा, हास्यविनोद चालतात तसे चालले होते. ‘बॅरिस्टर’ नाटकाच्या प्रयोगाआधी तो मला म्हणाला, “बसतोयस का नाटकाला?” मी म्हणालो, म्हणजे काय, बसणारच!” प्रयोग सुरू झाला आणि काही क्षणांपूर्वी माझ्याशी गप्पा मारणाऱ्या विक्रमने एंट्री घेतली. नाटक आधी पाहिले असूनही मी त्याच्या भूमिकेशी इतका समरस झालो, की त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून मध्यांतरात आतही गेलो नाही. नाटक संपल्यावर भेट होणं अटळच होतं.

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

आत गेल्यावर तो समोर आला असता, तो विक्रम आहे याचे भान न राहिल्यामुळे माझ्या तोंडातून शब्द फुटेना! शेवटी त्यानेच, “काय रे” म्हणून मला भानावर आणलं तेव्हा मी म्हणालो, “मी अजून नाटकातच आहे” तेव्हा तो हसला. भूमिकेतून तो केव्हाच मुक्त झाला होता; पण, मी मात्र अडकलो होतो. मला ‘परकाया प्रवेश’ म्हणजे काय हे त्या दिवशी समजले. खरोखरच ‘बॅरिस्टर’ हा त्याच्या अभिनय सामर्थ्याचा कळस होता. तो आता आपल्यात नाही ही कल्पना सहन होत नाही.

लेखक : पं.विनोदभूषण आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.