Pimpri News: दररोज पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत नागरिकच पाणी पाजतील – विलास लांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण पूर्ण भरले आहे. आता तरी शहरवासीयांना मुबलक आणि दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पालिकेतील भ्रष्टाचारात व्यस्त असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत कोणतेच नियोजन केलेले नाही. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे. नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीत जनता पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिला आहे.

सध्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची वाढती पातळी पाहता पाण्याचा विसर्गही करण्यात आला. धरणात पुरेसा पाणी साठा आहे. तरीही सध्या शहरात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा नियमित करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय नागरिकांना मुबलक पाणी न मिळाल्याने त्यांची अडचण होत आहे. चाकरमान्यांचे, गृहणींचे हाल होत असून ते संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे नियमित पाणी पुरवठा होणे गरजेचे असल्याचे लांडे म्हणाले.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पाणी पुरवठा मुबलक व पुरेसा केला जात होता. पवना धरण परिसरात पाण्याचा साठा वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः शहरवासियांची गरज व मागणी पाहून दररोज पाणी पुरवठा करण्याची सूचना करत होते. सध्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या हिताचे काहीही पडलेले नाही, हे स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादीने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी करूनही गेंड्याच्या कातडीच्या सत्ताधा-यानी आणि प्रशासनाने याबाबत कसलेही नियोजन केले नाही, असे लांडे यांनी म्हटले आहे.

भामा, आसखेड आंद्रा पाईपलाईनचे केवळ गाजर

पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने भामा, आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 27.70 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्यासाठी मोठा गाजावाजा केला. मात्र, जमीनी ताब्यात घेणे, शासन स्तरावर परवानगी आदीसह इतर अडीअडचणी सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे.

केवळ ऑनफिल्डचा दिखावा करण्याऐवजी प्रत्यक्ष हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांची तहान भागवावी, अशी सूचना लांडे यांनी केली आहे. मात्र, आता हा प्रकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकाळातच पूर्ण होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेच त्याचा शुभारंभ होईल, असे लांडे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.