Pimpri News: महापालिका नगरसेवक आणि ठेकेदारांना चरण्याचे कुरण बनली आहे काय?- विलास लांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम घेण्यासाठी अनुभवाचा बनावट दाखला सादर केल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी यातील ठेकेदाराला वाचवण्यासाठी सर्वसाधारण सभेत एकमेकांवर चिखलफेक केली. ‘तु माझे प्रकरण बाहेर काढले, तर मी तुझेही बाहेर काढेन’, अशा अविर्भावात नगरसेवक सभागृहात बोलत होते. महापालिका ही नगरसेवक आणि ठेकेदारांना चरण्याचे कुरण बनली आहे काय ? असा सवाल माजी आमदार विलास लांडे यांनी केला.

सभागृहात लोकांच्या प्रश्नांवर कमी आणि ठेकेदारांना वाचवण्यावर अधिक चर्चा केली जाते. गेल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात सत्ताधा-यांनी केवळ भ्रष्टाचार करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगत लांडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी निविदा भरलेल्या ठेकेदाराने अनुभवाचा बनावट दाखला सादर केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

ठेकेदारांसोबत सत्ताधा-यांची भागिदारी असून बनावट दाखला देणा-या संस्थेवर कारवाई करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. प्रतिमहा ठेकेदाराला सुमारे एक कोटी 25 लाख रुपयांचे बिल अदा केले जाते. पालिकेने त्यांच्यासोबत तीन वर्षाचा करारनामा करवून घेतला. या कामापोटी 36 महिन्यांसाठी सुमारे 45 कोटी अदा केले जाणार आहेत.

त्यातच बनावट दाखला सादर करून ही संस्था राजरोसपणे काम करत आहे. या कामासाठी अशा तीन संस्था नेमण्यात आल्या असून यात सत्ताधारी पक्षासह अन्य राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींची भागीदारी आहे. वर्षाला तीन संस्थासाठी सुमारे 140 कोटी रुपयांची बिले अदा केली जाणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.