Pimpri : स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळेगुरवमध्ये ‘व्हिलेझ प्लाझा’ तर पिंपळे सौदागरमध्ये क्रीडा संकुल 

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय 

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळेगुरवमध्ये ‘व्हिलेज प्लाझा’ तर पिंपळेसौदागरमध्ये बहुसुविधा क्रीडा संकुल विकसित करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रकल्प अहवालास मान्यता देत निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्तावर (पीपीपी) विकसित केले जाणार आहेत. क्रीडांगण आणि उद्यान हटवून ही कामे केली जाणार आहेत. आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. याबाबतचा निर्णय आज (गुरुवारी) झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरात ‘ग्रीन बेल्ट’ तयार करण्यात येणार असून त्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची आज सहावी बैठक पार पडली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व पीसीएससीएलचे अध्यक्ष डॉ. नितीन करिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे संचालक महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, क्रेंद सरकारच्या प्रतिनिधी ममता बात्रा, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी अतिरिक्त विभागीय आयुक्त पी.एस.खांडेकर, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, राजन पाटील, प्रकल्प महाव्यवस्थापक अ.मा. भालकर, वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे उपस्थित होते.

पत्रकारांना माहिती देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”एरिया बेस अंतर्गत  पिंपळेगुरवमध्ये ‘व्हिलेज प्लाझा’ तर पिंपळेसौदागरमध्ये बहुसुविधा क्रीडा संकूल विकसित करण्यात येणार आहे. ‘व्हिलेज प्लाझा’साठी 48 कोटी तर क्रीडा संकुलासाठी 34 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (अभिव्यक्ती स्वारस्य) मंजुरी देण्यात आली आहे. कोकणे चौक येथील नियोजित रिंगरोड अंतर्गत दिल्ली येथील भूमिगत पालिका बाजार व्यापार संकुलाच्या धर्तीवर महापालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार संकुल उभारणार आहे. त्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून निविदा काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल”.

”हिंजवडी असोसिएशनने मागणी केल्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या हिंजवडीतील वाहतुकविषयी समस्यांबाबत पॅनसिटी सिटी सर्व्हिल्नेस अंतर्गत 25 ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. टेक महिंद्रा लिमिटेड यांच्याकडून हे काम केले जाणार असून 16 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एमआयडीसीकडून निधी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे. याशिवाय तळेगाव, चाकण एमआयडीसी क्षेत्रात देखील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचा खर्च गृहविभाग करणार असल्याचे” आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

”शहरात ‘ग्रीन बेल्ट’ तयार करण्यात येणार असून त्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  लँडस्केपिंग, टेकड्या एकमेकांना जोडून कनेक्टेड ग्रीन स्ट्रीट करण्यात येणार आहे. शहरातील पवना आणि इंद्रायणी नदीच्या कडेला देखील असा हरित पट्टा करण्यात येणार आहे.  तसेच स्मार्ट सिटीतील कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी 17 अभियंत्यांची दोन वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. भरती करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे”, हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.