Pune News : कोरोना नियमांचे उल्लंघन : कोरेगाव पार्क येथील चार बड्या हॉटेलवर कारवाई

एमपीसी न्यूज : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील चार बड्या हॉटेलवर पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली.  या सर्व हॉटेलवर भादवी कलम 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हॉटेल टल्ली लेन, हॉटेल डेली, हॉटेल मर्फीज आणि हॉटेल पब्लिक अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सची नावे आहेत. हा प्रकार उघडकीस आल्याने शहरातील हॉटेल्स व्यावसायिक कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे उघडकीस आले आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या वाढत्या रुग्ण संख्येला आळा बसावा यासाठी महापालिका प्रशासनाने काही नियमावली आखून दिली आहे. हॉटेल्सना 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी करून घेण्यात आली आहे. परंतु अनेक हॉटेल व्यावसायिकांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

 त्यामुळे परिमंडळ दोनशे पोलीस उपायुक्त सागर पाटील आणि काही पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरेगाव पार्क परिसरातील काही बड्या हॉटेल्सची पाहणी केली. तेव्हा या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात नियमाचे उल्लंघन होताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी वरील चार हॉटेल वर कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.