Chinchwad : कार्यकर्त्यांच्या बैठकीत पदाधिकारी महिलेचा शिवसेनेच्या पदाधिका-याकडून विनयभंग

एमपीसी न्यूज – भोसरी मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत एका पदाधिका-याने माजी खासदारांबद्दल अर्वाच्य शब्द वापरल्याने भर बैठकीत गोंधळ झाला. यावरून झालेल्या हमरीतुमरीत पदाधिकारी महिलेचा ‘त्या’ पदाधिका-याने विनयभंग केला. हा प्रकार आज (बुधवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.
बाजीराव लांडे (वय 60, रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 47 वर्षीय पदाधिकारी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी पक्षाचे मतदारसंघातील ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी फिर्यादी यांचे कार्यकर्ते बैठकीत त्यांचे मत मांडत होते. यावेळी आरोपीने एका माजी खासदारांबाबत अर्वाच्य शब्दप्रयोग केला. फिर्यादी यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी यांचा विनयभंग केला. एक कार्यकर्ता हे भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपीने त्यांना देखील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेनंतर पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आदी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.