Book Publish : भारतीय संस्कृतीची वैभवशाली परंपरा उलगडणारे `विरासत का वैभव`

एमपीसी न्यूज :  ( राजन वडके ) : प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ विष्णू तथा हरिभाऊ श्रीधर वाकणकर यांची जन्मशताब्दी  संस्कार भारती, पश्चिम प्रांताच्या वतीने साजरी करण्यात आली. हरिभाऊंनी केलेले संशोधन समाजासमोर यावे. त्याचबरोबर भारतीय परंपरेच्या प्राचीन वैभवाची सचित्र अधिकृत माहिती सांगणारा `विरासत का वैभव` हा अमूल्य असा ग्रंथ संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताच्या वतीने विवेक व्यासपीठाच्या सहकार्याने नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.

पुरातत्व संशोधनात हरिभाऊंनी केलेल्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येत असल्याचे प्रसिद्ध चित्रकार आणि संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत यांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे. मुखपृष्ठावरूनच या ग्रंथात भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेचा वारसा सांगणारा बहुमूल्य ठेवा दडल्याचे जाणवते. 

या ग्रंथाचे प्रत्येक पानावरील कलाकृती पाहताना, तिची माहिती वाचताना आपण नकळतच त्या काळात जातो. हजारो वर्षांपूर्वीही भारतीय शिल्पकला, चित्रकला किती प्रगल्भ होती, अभियांत्रिकी अभ्यास किती प्रगत होता याची प्रचिती येते. महाराष्ट्रातील कार्ला, कान्हेरी, अजंठा-वेरूळ लेण्यांपासून तमीळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, सारनाथ, छ्त्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पाँडिचेरी, आसाम, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ ते अगदी काश्मीरपर्यंतच्या सांस्कृतिक वारशाचा खजिना खुला होतो.

 

प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदू, बौद्ध, जैन यांच्यासह तत्कालीन भारतीय संस्कृतीची महती उलगडत जाते. देवदेवतांच्या मूर्ती, मंदिरे, ताम्रपट, शीलालेख, सामाजिक प्रतिके, तत्कालीन नाणी, भांडी, खेळणी, गड, किल्ले आदी भारताचे प्राचीन वैभव दर्शविणाऱ्या स्थानांची स्थळ-काळासह वैशिष्ट्य सांगणारी महत्वपूर्ण अशी माहिती या ग्रंथात आपल्याला पहायला आणि वाचायला मिळते. अतिशय सुबक, आकर्षकपणे आणि सोप्या हिंदी व इंग्रजी भाषेत या प्राचीन ठेव्याची माहिती देण्यात आली आहे. 

 

नैसर्गिक संकटे, परकीयांच्या आक्रमणे सहन करत हजारो वर्षे टिकलेल्या या प्राचीन कलाकृतींनी आपली भारतीय संस्कृती जागृत ठेवली आहे. भारतीय संस्कृतीची परंपरा टिकवण्यासाठी आणि प्रसारासाठी सम्राट अशोकापासून हर्षवर्धन, खारवेल महाराज, राजराज चोल आदी अनेक राजे-महाराजांनी त्यांच्या काळात केलेल्या कार्याचीही माहिती या ग्रंथात कळते. या प्राचीन ठेव्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रवाह अव्याहत सुरू  आहे. भारतीय संस्कृतीला चालना देणारे आणि चैतन्य निर्माण करणारे हे प्राचीन वैभव अंतर्मुख करणारेही असल्याचे या ग्रंथामुळे आधोरेखीत होते. 

 

प्रत्येक भारतीयाने वाचावे अशा भारतीय सांस्कृतिक परंपरेची महती सांगणाऱ्या `विरासत का वैभव` या ग्रंथाचे संपादक प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर आहेत. या ग्रंथासाठी डॉ. भाग्यश्री पाटसकर, सौ. विनिता देशपांडे, सौ. धनलक्ष्मी टिळे, सौ. शलाका गोटखिंडीकर आणि मोहन शेटे यांनी लेखन केले आहे. तर सौ. विनिता देशपांडे (हिंदी) आणि प्रशांत तळणीकर (इंग्रजी) यांनी अनुवाद केला आहे. तर संस्कार भारती, पश्चिम प्रांताचे महामंत्री सतीश कुलकर्णी यांनी ग्रंथाचे मुखपृष्ठ व अंतर्गत सजावट केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.