पुणे – अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कायद्यासाठी पुण्यात 9 डिसेंबरला विराट धर्मसभा

विश्व हिंदू परिषद कडून आयोजन

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर निर्माणासाठी संसदेत कायदा करावा म्हणून, पुण्यात विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद पुणेच्या वतीने ही धर्मसभा होणार आहे. रविवार, दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता, बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कागशिला पिठाधिश्वर महंत साध्वी प्रज्ञा भारतीय जी, प.पू. अतुलशास्त्री भगरे गुरुजी, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला यांसह पुणे शहरातील संत महात्म्य उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रिय मंत्री शंकरजी गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे विशेष संपर्क प्रमुख आणि सभा संयोजक किशोर चव्हाण, सहसंयोजक श्रीकांत चिल्लाळ, प्रचारप्रमुख नितीन महाजन, कसबा भाग मंत्री धनंजय गायकवाड, गणेश वनारसे, श्रीपाद रामदासी, अतुल सराफ, नाना क्षीरसागर उपस्थित होते.
शंकरजी गायकर म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार विवादित जागेचे उत्खनन करण्यात आले आणि त्यामध्ये मंदिराचे अवशेष सापडले. त्यामुळे अखेर न्यायालयाने हे मान्य केले की ; त्या जागी मंदिर होते आणि हीच प्रभूरामचंद्रांची जन्मभूमी आहे. ऑकटोबर 2018 मध्ये या प्रकरणाचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता असताना पुन्हा पुढची तारीख देण्यात आली, तारीख पे तारीख तारीख पे तारीख… असा सिलसिला अजून किती वर्षे चालणार? म्हणूनच साधू संतांनी ठरवले की आता सरकारने अध्यादेश काढून भव्य अशा मंदिर निमार्णाचा मार्ग मोकळा करावा. हिंदूंना आता वायदा नको तर मंदिर निर्माणाचा कायदा हवा आहे.

ते पुढे म्हणाले, जनआंदोलनाशिवाय श्रीराम मंदिर निर्माणासाठी संसदेत कायदा होणार नाही आणि म्हणूनच संतांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, संपूर्ण देशभर राममंदिर निर्माणाकरीता हिंदू जनमानसात जागृती निर्माण करायचे ठरले आहे. याचाच एक भाग म्हणून देशभरातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक धर्मसभा आयोजित करून, तेथील जनतेच्या वतीने त्या त्या लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. कोटी कोटी हिंदूजनमानसाच्या भावनांचा आदर करत, संसदेमध्ये कायदा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीच आता पुढाकार घेतला पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.