Ind vs Eng: शार्दुल आणि भुवनेश्वरच पुरस्काराचे खरे हक्कदार! विराट कडाडला

एमपीसी न्यूज :  भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला सात धावांनी मात दिली.  या सामन्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहली याने गोलंदाजांना दिले आहे. तसेच या सामन्यात चांगली कामगिरी करणारा शार्दुल ठाकूर आणि संपूर्ण मालिकेमध्ये भेदक गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमार याला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले. 

रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने झुंजार खेळ केला. मात्र अखेरच्या क्षणी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान, या सामन्यात नाबाद ९५ धावांची खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या सॅम करणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर पहिल्या दोन सामन्यात तुफानी फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, जेव्हा दोन आघाडीचे संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा ते सामना अटीतटीचे होतात. सॅम करणने खूप चांगली खेळी केली. मात्र आमच्या गोलंदाजांनी सातत्याने बळी टिपले. तसेच शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि नटराजन यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही काही झेल सोडले, ही बाब निराशाजनक होती.

मात्र असे असले तरी अखेरीस आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. मात्र शार्दुल ठाकूरला सामनावीर आणि भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार मिळाला नाही, याचे मला आश्चर्य वाटले. सर्वात जास्त श्रेय हे गोलंदाजांनाच आहे कारण त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.