Dapodi : विशाल जाधव यांना मिळणार शहिदाचा दर्जा

स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – दापोडी दुर्घटनेत कर्तव्य बजावित असताना वीरमरण आलेले अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल हणमंतराव जाधव यांना शहिदाचा दर्जा दिला जाणार आहे. महापालिका इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (बुधवारी) मान्यता दिली असून महासभेच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दापोडी येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात मजूर अडकला. त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल जाधव यांच्या अंगावर माती व दगड कोसळले. त्यामध्ये विशाल यांचा मृत्यू झाला. त्यांना महापालिकेची नियमित मदत मिळणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये अशीच घटना घडल्यानंतर त्या ठिकाणच्या कर्मचा-यांना ‘शहीद’ म्हणून दर्जा देण्यात आला होता.

त्याच धर्तीवर विशाल जाधव यांनाही शहिदाचा दर्जा दिला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात येणार असून तिथे मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.