Pimpri : नवीन महापौरांची चापेकर राष्ट्रीय संग्रहालयास भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन महापौर राहुल जाधव यांनी आज (रविवार) चिंचवड येथील चापेकर राष्ट्रीय संग्रहालयास भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी चापेकर राष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी पाठपुरावा करणार असून चापेकर स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 

महापौर राहुल जाधव यांनी चापेकर वाड्याला भेट दिली. वाड्यातील चापेकर बंधूंच्या राष्ट्रीय स्मारकाला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. यावेळी चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे, सदस्य गतीराम भोईर, अशोक पारखी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते. चापेकर स्मारक समितीच्या वतीने जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

राहुल जाधव म्हणाले, क्रांतिवीर चापेकर बंधूंचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण देशाला राहावे, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावात सहा माजली राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. चापेकर बंधूंच्या स्मारकाचे काम वेगात व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. हे स्मारक संपूर्ण देशाला प्रेरणा देणार आहे. त्यामुळे याचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेणे ही आपली जबाबदारी आहे. माझ्या कार्यकाळात हे ऐतिहासिक काम पूर्ण झाले तर याचा मला सार्थ अभिमान वाटेल. त्यामुळे या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.