Vivo Withdraws IPL Sponsorship: ‘विवो’ची प्रायोजक पदावरून माघार, बीसीसीआयला शोधावा लागणार नवीन प्रायोजक

Vivo withdraws sponsorship IPL 2020 Sponsorship या स्पर्धेसाठी विवोला प्रायोजक म्हणून कायम ठेवल्याने बीसीसीआयला सोशल मीडियावर टीका सहन करावी लागली होती.

एमपीसी न्यूज – बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात आयपीएलचा 13 वा हंगाम खेळविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्पर्धा सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे मुख्य प्रायोजक असलेल्या विवो कंपनीने बीसीसीआय बरोबरचा करार मोडत स्पर्धेच्या प्रायोजक पदावरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयला यंदाच्या हंगामासाठी नवा प्रायोजक शोधावा लागणार आहे.

यंदा ही स्पर्धा युएईमध्ये भरविण्यात येणार असून त्यासाठी प्रायोजक म्हणून विवो या चिनी मोबाइल कंपनीची निवड करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला संघर्ष लक्षात घेता विवोने या हंगामासाठी हा करार मोडीत काढला आहे. त्यानुसार 13 व्या हंगामासाठी विवो आयपीएलच्या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून काम करणार नाही.

आयपीएलची तारीख जाहीर झाली असून विवोने घेतलेल्या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे बीसीसीआयला आता नवीन प्रायोजक शोधावा लागणार आहे.

या स्पर्धेसाठी विवोला प्रायोजक म्हणून कायम ठेवल्याने बीसीसीआयला सोशल मीडियावर टीका सहन करावी लागली होती. भारतात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झाले असताना बीसीसीआयने देखील हे प्रायोजक पद सोडावे अशी मागणी होऊ लागली होती. मात्र ही मागणी झुगारून बीसीसीआयने प्रायोजक म्हणून विवोची निवड केली होती.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या तोंडावर विवो कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे. 19 सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील पहिल्या सामन्याने तेराव्या हंगामास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयला प्रायोजक शोधावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.