Pimpri : पथनाट्यातून मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्यासारखे विविध उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहेत. पथनाट्यातून मतदान जनजागृती केली जात आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मतदानाची शपथ दिली.

जिल्हा स्वीप समन्वयक अनिल पवार, यशवंत मानखेडकर, आशाराणी पाटील,  महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांचे मार्गदर्शनाखाली 206  पिंपरी मतदारसंघ, 205 चिंचवड मतदारसंघ व 207 भोसरी विधानसभा मतदारसंघात पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात मोठे बसथांबे,  भाजी मंडई, मोठे चौक, शैक्षणिक संस्था, गर्दीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात आलेली आहेत.

मोरवाडी, पिंपरी येथील फोर्बस मार्शल या कंपनीमध्ये आज (मंगळवारी) पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक राजेश कुलकर्णी, मनुष्यबळ व्यवस्थापक प्रविण भोसले, सचिन नरके, एच.आर.अधिकारी निखिल पंडित, शासनाचे कामगार कल्याण निरीक्षक संजय सुर्वे तसेच मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता.

यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थित कंपनी अधिकारी व शेकडो कामगार यांना मतदानाची शपथ दिली. तसेच त्यांनी येत्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदारांकरिता पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. यावेळी सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर स्थापित करण्यात येणार आहेत.

दिव्यांग व्यक्तींकरीता रस्त्यापासून मतदान केंद्रापर्यंत व्हीलचेअरची सुविधा, तसेच रॅंम्पची सोय असणार असून दिव्यांगांना रांगेत उभे रहावे लागणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. मतदानासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत इतका वेळ उपलब्ध असून कंपनीतील प्रत्येक मतदाराने मतदान करावे. त्याच्या कुटुंबीयांना, मित्रांना मतदान करण्यास सांगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.