Vadgaon Maval News : वडगाव ग्रामपंचायतच्या शताब्दी उत्सवानिमित्त 100 वर्षातील सेवेक-यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, वडगाव ग्रामपंचायतीचा शताब्दी महोत्सव, महाराष्ट्र दिन आणि मावळ विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त मागील 100 वर्षातील सेवेक-यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यामध्ये सन 1922 ते 2022 या 100 वर्षांतील सर्व हयात असलेले आणि नसलेले सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री पोटोबा देवस्थानचे आजी माजी विश्वस्त, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पोलीस पाटील यांना तसेच दिवंगत आदरणीय व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांना गौरविण्यात येणार आहे. रविवारी (दि.1मे) सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिर प्रांगण, वडगाव मावळ येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

ज्या पदाधिकाऱ्यांनी मागील 100 वर्षांत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पोलीस पाटील या पदांवर कार्यरत असतांना वडगावची सेवा केली आहे. 97 वर्ष ग्रामपंचायत असलेल्या वडगावची सन 2018 मध्ये नगरपंचायत झाली. या 100 वर्षात अनेक मान्यवरांनी विविध पदांवर चांगले काम केले आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे वडगावचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्याचा विचार मावळ विचार मंचने केला आहे.

या कार्यक्रमासाठी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन मावळ विचार मंच वडगांव मावळचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, अध्यक्ष शंकरराव भोंडवे, कार्याध्यक्ष वैशाली म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख श्रेया भंडारी, सर्व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.