Wagholi Crime News : विक्रीसाठी आणलेला 20 किलो गांजा जप्त, एकाला अटक

एमपीसी न्यूज – वाघोली येथील वाघोली-केसनंद रस्त्यावर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल 20 किलो गांजा जप्त केला आहे.

या गांजाची किंमत तीन लाख 47 हजार रुपये इतकी आहे. अंबु उर्फ अंबादास दशरथ पवार (वय 35 रा.गायकवाड वस्ती कोलवडी ता. हवेली जि. पुणे मूळ गाव जेजला ता. भूम जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना वाघोली केसनंद रस्त्यावर संशयास्पद अवस्थेत एक दुचाकी चालक दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला थांबवले आणि त्याची झडती घेतली असता दुचाकीवर असलेल्या एका पोत्यामध्ये 20 किलो गांजा असल्याचे आढळले.

पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8(ब), 20(ब) 2(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.