Pimpri news : कोरोना चाचणीसाठी थांबावे लागते तासन तास वेटिंग वर!

चाचण्यांचे प्रमाण वाढले; दिवसाला 11 हजाराहून अधिक होताहेत चाचण्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकालाही चाचणी करावी लागते. तसेच कंपनीतील कामगारही मोठ्या प्रमाणात चाचणी करत आहेत. चाचणी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे.

परिणामी, चाचणी केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे अनेक नागरिकांना टोकन घेण्यासाठी तासन तास  थांबावे लागते. चाचणीचा नंबर येण्यासाठीही वेटिंगवर थांबावे लागत आहे. त्यामुळे चाचणी केंद्रामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे. दिवसाला सरासरी 11 हजार चाचण्या केल्या जात आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच ते सात जणांची तपासणी केली जात आहे. महापालिकेतर्फे आकुर्डी दवाखाना, तालेरा, वायसीएमएच, खराळवाडीतील बालभवन, पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, यमुनानगर, म्हेत्रे वस्ती दवाखाना, थेरगाव आणि सांगवी रुग्णालयात अशा दहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र आहेत.

दिवसाला सरासरी आठ ते 11 हजार चाचण्या केल्या जात आहेत. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे.  कंपनीतील कामगारांना दर 15 दिवसाला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र असल्यानंतरच त्यांना कंपनीत घेतले जाते.

चाचणी करण्यासाठी नागरिक, कामगारांची गर्दी होते. पहाटे पाच वाजल्यापासून टोकन घेण्यासाठी नागरिक रांगेत थांबतात. साडेनऊ वाजता चाचणी करण्यास सुरुवात केली जाते. त्यानंतर टोकन दिले जाते. चाचणीचा नंबर येण्यासाठी पाच पाच तास वेटिंगवर थांबावे लागते. यमुनानगर, शाहूनगर येथील बीएसएनएल आणि  भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृह या औद्योगिक पट्यातील चाचणी केंद्रांवर  कामगारांची मोठी गर्दी होत आहे.

चाचणीसाठी आलेले नागरिक अंतर ठेवून उभे राहत नाहीत. पाच तास एकत्र थांबतात. तपासणी करण्यासाठी आलेल्या एखाद्याला कोरोना नसला तरी गर्दीतून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी महापालिकेने चाचणी केंद्रामध्ये वाढ करावी. चोवीस तास एखादे चाचणी केंद्र सुरू ठेवावे. जेणेकरून रात्री अपरात्री कोणाला त्रास होऊ लागल्यास आणि चाचणी करण्याची आवश्यकता भासल्यास चाचणी करणे सोपे होईल. त्यामुळे चोवीस तास चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

सोनबा महानवर म्हणाला, “मी भोसरीतील एका कंपनीत नोकरीला आहे. कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय कंपनीत घेतले जात नाही. मी सकाळी साडेपाच वाजता बीएसएनएल येथील चाचणी केंद्रात तपासणी करण्यासाठी आलो. साडेनऊला चाचणी केंद्र सुरू होते. त्यानंतर टोकन दिले जाते. त्यानंतरही चाचणीसाठी दोन तास थांबावे लागत आहे. या गर्दीतून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाचणी केंद्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे”

प्रतिक्षेतील अहवालाची संख्याही वाढली!

कोरोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रतिक्षेतील अहवालाचीही संख्या वाढली आहे. दिवसाला 11 हजाराच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. पण, त्यातील प्रतिक्षेतील अहवालाचे प्रमाण जास्त आहे. दिवसाला सरासरी साडेसहा ते सात हजार जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याचे महापालिकेच्या कोरोनाच्या प्रेसनोटवरील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

याबाबत महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेडी म्हणाले, “महापालिकेतर्फे दहा ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात आहे. दिवसाला सरासरी 11 हजाराच्या आसपास चाचण्या होत आहे. कोरोना चाचणी केंद्रात वाढ करण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही”.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.