Pimpri : अत्याचार पीडितेला वायसीएमएच्‌मध्ये उपचाराची प्रतीक्षा; दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी 

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली मागणी 

एमपीसी न्यूज –  चिंचवड येथील लैंगिक अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय उपचार करण्यास महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयातील डॉक्‍टरांनी हलगर्जीपणा केला. असमर्थता दर्शवत उपचाराकरिता मुलीला ससून रुग्णालयात पाठविले. डॉक्‍टरच्या या असंवदेनशीलतेमुळे नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. त्यामुळे अशा असंवेदनशील व बेजबाबदार वर्तणूक करणा-या डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुलीवर उपाचारासाठी डॉक्टरांकडून झालेल्या हलगर्जीपणाची सविस्तर हकीकत सांगितली. यावेळी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर वैशाली घोडेकर, नगरसेवक राजू बनसोडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

चिंचवड येथे मंगळवारी (दि.2) रात्री एका चार वर्षाच्या मुलीवर एका आरोपीने लैंगिक अत्याचार करुन, तिला जखमी करुन सोडून दिले. अशा अवस्थेत ती घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी विचारल्यानंतर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी तिला वैद्यकीय उपचारांकरिता तत्काळ महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयात आणले. परंतु त्या अत्याचारग्रस्त मुलीवर प्रथमोपचार न करता पुढील उपचार करण्यास उपस्थित वैद्यकीय अधिका-यांनी असमर्थता दर्शविली. तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.

चिंचवडमधील पीडित चार वर्षांच्या मुलीवर उपचार करुन हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळून मुलीच्या नातेवाईकांना धीर देऊन त्यांना दिलासा देणे गरजेचे होते. परंतु, वायसीएमएच् मधील सर्वच वैद्यकीय अधिका-यांनी हे प्रकरण अतिशय असंवेदशीलपणे हाताळून, त्या मुलीला व तिच्या नातेवाईकांना मन:स्ताप दिला आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असतानाच वायसीएममधील डॉक्‍टरांच्या अशा वागणुकीमुळे त्यात भर पडली आहे.

या निंदनीय प्रकाराला जबाबदार असणा-या सर्वच वैद्यकीय अधिका-यांची सखोल चौकशी करावी. दौषी वैद्यकीय अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.