Nigdi News : प्राधिकरणातील रहिवाशांना ट्रान्सफर फी माफ करा –  समीर जावळकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रहिवाशांना ट्रान्सफर फी व अधिभार माफ करावा. तसेच त्यांना अभिहस्तांतरण प्रक्रिया (कन्व्हेयन्स डीड) करून देऊन जमिनीचे मालक करावे, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील, महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले. त्यात जावळकर यांनी म्हटले आहे की, शासनाच्या निर्णयाप्रमाणे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त झाले आहे. त्याबाबतच्या अधिसुचनेनुसार राज्य शासनातर्फे मालमत्ता, निधी व देय रकमा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे निहीत करण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्राधिकरणाने  भाडेपट्याने दिलेले, विकसित झालेले भुखंड, सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणाखाली भुखंड व ज्यावर अतिक्रमण झाले आहे. असे भुखंड यांची मालकी, ताबा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

प्राधिकरणातील सर्व सदनिकाधारक महापालिकेकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्णपणे सामावून घेणे आवश्यक आहे. हे सर्व सदनिकाधारक वेळोवर मालमत्ता कराचा भरणा करतात. त्यामुळे कसलाही अधिभार न लावता या सदनिकाधारकांना महापालिकेत सामावून घेणे आवश्यक आहे. सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना कन्व्हेयन्स डीड करुन सदनिकाधारकांना फ्लॅटची पूर्णपणे मालकी देण्यासंदर्भातील कारवाई महापालिकेने सुरु करावी. जेणेकरुन जमिनीचे मालक  होण्याचा मार्ग मोकळा होईल असे जावळकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.