Wajid Khan No More: नामवंत संगीतकार-गायक वाजिद खान यांचे निधन

Music director-singer Wajid Khan passed away

एमपीसी न्यूज – प्यार किया तो डरना क्या, दबंग, तेरे नाम, एक था टायगर आदी गाजलेल्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत संगीतकार जोडी साजिद-वाजिदपैकी वाजिद खान (वय 43) यांचे रविवारी (31 मे) रात्री दीर्घ आजाराने मुंबईतील सेठीया रुग्णालयात निधन झाले. किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे सुमारे तीन महिन्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती आणि काल रात्री अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 

किडनी आणि घशातील जंतूसंसर्गामुळे वाजिद यांना रुग्णालयात दाखल केले. घशातील संसर्गामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती, परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद खान यांना मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.

सुपरस्टार सलमान खान त्याची आवडती संगीतकार जोडी साजिद-वाजिद बरोबर

वाजिद खान यांच्या निधनाच्या वृत्ताला संगीतकार सलीम मर्चंट यांनी दुजोरा दिला आहे. “होय, हे खरं आहे की वाजिद आता आपल्यात राहिले नाहीत.” परंतु सलीम यांनी कोविड-19 मुळे वाजिद यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. “जवळपास सहा महिन्यांपूर्वी वाजिद यांना किडनीचा त्रास झाला होता आणि मग त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांची रोगप्रतिकारशक्ती फारच कमी झाली होती. वाजिद यांच्या घशातही इन्फेक्शन झाले होते. ज्यामुळे त्यांना घशात फार त्रास होत होता. वाजिद यांच्या निकटवर्तींयांकडून समजलं की त्यांच्या मृत्यूचे कारण हे किडनीशी संबंधित अडचणी होत्या,” असे सलीम यांनी सांगितले.

सलमान-काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 1998 मधील ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाद्वारे साजिद-वाजिद यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर वाजिद यांनी साजिदच्या साथीने सलमान खानच्या तेरे नाम, मुझसे शादी करोगी, पार्टनर, हेलो, गॉड तुस्सी ग्रेट हो, वॉण्डेड, वीर, दबंग, एक था टायगर, नो प्रॉब्लम या सांरख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले होते.

साजिद-वाजिद यांनी क्या यही प्यार है, किलर, शादी करके फंस गया यार, चोरी-चोरी, कल किसने देखा, तुमको न भूल पाएंगे, जाने क्या होगा, कल किसने देखा इत्यादी चित्रपटांनाही संगीत दिलं. याशिवाय सारेगामापा या सांगितिक कार्यक्रमाशीही ते अनेक वर्ष जोडले होते.

ऐका, साजिद- वाजिद यांनी संगीतबद्ध केलेले ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाचे टायटल साँग….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.