Wakad : गुन्हे शाखेकडून 200 लिटर हातभट्टी दारू आणि कच्चे रसायन जप्त; तरूणाला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 140 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि 60 लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन असा एकूण 16 हजार 710 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सचिन विजय माछरे (वय 28, रा. गुजरनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गुजरनगर, थेरगाव येथे सोमवारी (दि. 27) रात्री पावणेनऊच्या सुमारास करण्यात आली. आरोपी सचिन हा बेकायदेशीररीत्या हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीच्या घरावर छापा मारला. त्यावेळी त्याच्या घरातून 140 लिटर गावठी हातभट्टीची दारू, 60 लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन आणि दारू विक्रीची 310 रुपये रोख रक्कम असा एकूण 16 हजार 710 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

आरोपीने स्वतःकडे विक्रीसाठी दारू बाळगल्याने दारू खरेदी करण्यासाठी परिसरात गर्दी झाली. हा प्रकार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक असल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.