Wakad : 25 लाखांचे 201 मोबाईल मूळ मालकांना केले परत; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – वाकड परिसरातून चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले 25 लाख रुपये किमतीचे 201 मोबाईल फोन वाकड पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. हा मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आज (गुरुवारी) पोलीस आयुक्तालयात पार पडला.

पायी चालत जाणा-या, दुचाकीवरून, कारमधून, घरातून जबरदस्तीचे हिसकावून नेलेले तसेच हरवलेल्या 700 मोबाईल फोनची माहिती काढण्यात आली. सर्व मोबाईल फोन ट्रॅक केल्यानंतर 201 मोबाईल फोन महाराष्ट्रासह विविध राज्यातून हस्तगत करण्यात वाकड पोलिसांना यश आले. सर्व मोबाईल फोन पोलीस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचबरोबर वाकड पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील लता थोरवे (40 ग्रॅम), लता राऊत (12 ग्रॅम), संगीता बनसोडे (12 ग्रॅम), रेणूका बोडके (8 ग्रॅम), पार्वती पवार (28 ग्रॅम) यांचे एकूण १०० ग्रॅम वजनाचे सोने परत करण्यात आले आहे.

  • पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यापासून मोबाईल वाटप करण्याचा हा तिसरा कार्यक्रम आहे. वाकड पोलीस वेळोवेळी चांगल्या कारवाया करून उत्तम कामगिरी करीत आहेत. यापुढे देखील अशीच कामगिरी होणार आहे.”
_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, “वाकड पोलिसांनी 2 ऑगस्ट 2018 रोजी 100 मोबाईल फोन ट्रॅक करून ते मूळ मालकांना परत केले होते. त्यानंतर ही कारवाई पुढे सुरू ठेवली. 10 ते 70 हजार रुपयांपर्यंत किमतीचे मोबाईल फोन हरवले असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र विशेष पाठपुरावा करण्यास पोलीस प्रशासन कमी पडत होते. वाकड पोलिसांनी याचा पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात मोबाईल शोधून काढले.”

  • मोबाईलधारक राहुल आंबेगाव म्हणाले, “रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी माझा मोबाईल हिसकावून नेला. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता अंधार असल्याने फार दूरपर्यंत जाऊ शकलो नाही. तसेच अंधारामुळे गाडीचा नंबर देखील मिळवून शकलो नाही. पोलिसात धाव घेत तात्काळ गुन्हा नोंदवला. काही दिवसानंतर पोलिसांचा फोन आला आणि मोबाईल सापडल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल सापडल्याचे समजल्यानंतर खूप आनंद झाला. प्रेमाच्या दिवसादिवशी मोबाईल परत मिळाल्याने पोलिसांकडून हे ‘व्हॅलेंटाईन’ मिळाल्यासारखे वाटत आहे.”

तक्रारदार पूजा कसबे म्हणाल्या, “मागील काही दिवसांपूर्वी मी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नोकरीच्या शोधात जात होते. वाटेत माझा मोबाईल फोन हरवला. मोबाईल फोनमध्ये खूप महत्वाची माहिती होती. त्यामुळे मोबाईल हरवल्याची प्रचंड भीती वाटत होती. माझ्या मैत्रिणीने याबाबत तक्रार द्यायला सांगितले. त्यानुसार मी तक्रार दिली. केवळ फोनचा दुरुपयोग होऊ नये, एवढाच तक्रार देण्याचा उद्देश होता. हरवलेला मोबाईल फोन सापडणार याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. पण, एके दिवशी पोलिसांचा फोन आला आणि फोन सापडल्याचे सांगितले. हे समजले तेंव्हा मी हा आनंद पार्टीच्या स्वरूपात व्यक्त केला. पोलिसांनी मोबाईल शोधल्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो.”

  • ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी डी. डी. सणस, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, नितीन धोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, भैरोबा यादव, शाम बाबा, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, दीपक भोसले, मधुकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.