Wakad : वाकड परिसरात राहणारे कर्नाटक राज्यातील 300 मजूर ‘लालपरी’तून मूळगावी रवाना

Wakad: 300 laborers from Karnataka living in Wakad area left for their hometown by ST Bus

एमपीसी न्यूज – कर्नाटक राज्यातून रोजगाराच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या आणि वाकड परिसरात राहणाऱ्या 300 मजुरांना वाकड पोलिसांच्या मदतीने कर्नाटक राज्यात पाठवण्यात आले. वल्लभनगर बस आगारातून या बस रवाना करण्यात आल्या.

पिंपरी चिंचवड शहराची देशभरात औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. त्यामुळे नोकरी, रोजगाराच्या शोधात दररोज शेकडो जण देशाच्या विविध भागातून शहरात दाखल होतात. मिळेल ती नोकरी, काम करून आपला उदरनिर्वाह करतात. कुटुंबापासून दूर राहून काम करताना काही दिवसाच्या अंतराने गावी चक्कर मारून परत कामधंदा करणारी मंडळी लॉकडाऊनमुळे शहरात अडकली आहे.

त्यात भरीस भर म्हणजे लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल सुरू झाले. उधारीचं जगणं आणखीनच महाग झालं. शहरवस्तीत काम बंद झालं तर खर्चही बंद होतो, असं नाही. खर्च सुरूच राहतो. घरभाडे, रेशन, वैद्यकीय आणि अन्य अनेक आवश्यक गोष्टी पैशांशिवाय मिळत नाहीत. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या अनेकांचे हाल सुरू झाले.

या लोकांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. मात्र लॉकडाऊन वाढत असल्याने या मजुरांचे मन थाऱ्यावर राहत नव्हते. अनेकांनी पायीच घराची वाट धरली. शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करण्याची जीवघेणी धडपड अनेकांनी सुरू केली. त्यामुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी रेल्वे, बस काही प्रमाणात सुरू केल्या.

त्याच पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांनी देखील पुढाकार घेऊन वाकड परिसरात राहणाऱ्या कर्नाटक राज्यातील 300 मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवून दिले. यावेळी पोलिसांनी मजुरांच्या सुरक्षेची आणि इतर सर्व काळजी घेतली. या मजुरांसाठी पिंपरी चिंचवड मधील राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारातून बस सोडण्यात आल्या. लाल परीमध्ये बसून सर्व मजूर कर्नाटकच्या दिशेने निघाले.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, वल्लभनगर बस आगार प्रमुख पल्लवी पाटील आणि अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी, एसटी चे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत मजुरांना सॅनिटायझर, फूड पॅकेट, पाण्याची बाटली वाटप करण्यात आली. सर्व बसचे सुरुवातीलाच निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर बसमध्ये सर्वांना सामाजिक अंतर राखून बसवण्यात आले.

लाल परीमधून जाताना मजुरांनी मोठमोठ्याने घोषणा देत आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत जाणार आहेत. तिथून पुढचा प्रवास मजुरांनी संबंधित राज्याच्या परवानगीने आणि मदतीने करायचा आहे. त्याबाबत संबंधित प्रशासनाशी समन्वय राखला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.