Wakad: बेकायदेशीरपणे ‘त्या’ घरात राहणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल होणार

Wakad: A case will be filed against a woman living in 'that' house illegally कर्ज काढून वाकड येथे एक घर खरेदी केले आहे. त्याचे रीतसर खरेदीखत देखील झाले आहे. तरीही घर विकणा-या कुटुंबातील एक महिला वर्षभरापासून घराचा ताबा सोडत नाही.

एमपीसी न्यूज– घराची विक्री करून त्याचे कायदेशीरपणे खरेदी खत झाले. परंतु घर विकणा-या कुटुंबातील एक महिला वर्षभरापासून त्या घरात राहून घर खरेदी केलेल्या कुटुंबाला घराचा ताबा देत नाही. याबाबत घर खरेदी करणा-या महिलेने फिर्याद दिल्यास विकेलेल्या घरात बेकायदेशीरपणे राहणा-या संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी सांगितले आहे.

निशिगंधा शशांक अमोलिक असे या 52 वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे. त्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात.

त्यांनी कर्ज काढून वाकड येथे एक घर खरेदी केले आहे. त्याचे रीतसर खरेदीखत देखील झाले आहे. तरीही घर विकणा-या कुटुंबातील एक महिला वर्षभरापासून घराचा ताबा सोडत नाही. यामुळे खरेदी करणा-या नर्स महिलेवर केवळ कर्जाचे हप्ते भरण्याची वेळ आली आहे.

अमोलिक यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अमोलिक यांना संबधित महिलेने घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करण्यास सांगितले.

त्यानुसार अमोलिक यांनी घरात प्रवेश केला असता महिलेने त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच पोलिसांशी देखील हुज्जत घातली आहे. अमोलिक यांनी याबाबत फिर्याद दिल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान कलम 448 प्रमाणे गृह अतिक्रमणाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. मुगळीकर म्हणाले.

अमोलिक यांनी घर खरेदी केल्यानंतर ज्यांच्याकडून घर खरेदी केले आहे, त्यांना त्यांची व्यवस्था होईपर्यंत एक महिना त्याच घरात राहण्याची विनंती केली होती.

माणुसकी दाखवून अमोलिक यांनी घरात राहण्यास परवानगी देखील दिली. आता अमोलिक यांना त्यांचा चांगुलपणा आणि माणुसकी चांगलीच भोवली आहे.

काय आहे प्रकरण –

एक जुलै 2019, एक वर्षापूर्वी काळेवाडी परिसरात राहणाऱ्या आजी श्रीमती वसुंधरा वसंत भोसले यांच्याकडून रितसर खरेदी खत करून पावणेदोन गुंठे क्षेत्रफळ असलेले बैठे घर विकत घेतले.

त्यासाठी एजंट म्हणून डॉ. तेजस ढेंगळे यांनी मध्यस्थ म्हणून काम पाहिले. या कामी अमोलिक यांनी जीआयसी फायनान्स लिमिटेड या वित्तसंस्थेचे गृहकर्ज काढले व भोसले आजी यांना एकूण 56 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले आहेत.

घर घेतेवेळी डॉ. ढेंगळे यांनी आजींच्या कुटुंबात केवळ त्यांचा घटस्फोटीत मुलगा हा एकमेव सदस्य असल्याचे सांगितले. घटस्फोट झाल्याने सून त्यांच्याबरोबर राहत नाही.

त्याचबरोबर आजींना घराची किंमत मिळाल्यानंतर त्यांची राहण्याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना एक महिना याच घरात राहू द्यावे, त्याबदल्यात मी 25 हजार भाडे देण्याची हमी देतो, असे डॉ. ढेंगळे यांनी तोंडी सांगितले होते.

महिन्यानंतर डॉ. ढेंगळे यांनी त्यांच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये भोसले आजी व त्यांच्या मुलाला नेऊन ठेवले आणि त्यांची घटस्फोटीत सून डेझी नरेंद्र भोसले हिला अमोलिक यांनी घेतलेल्या घरात आणून ठेवले.

‘अशा पद्धतीने अमोलिक यांना अंधारात ठेवून, काहीही कल्पना न देता, त्या सूनबाईस तेथे राहू दिले. अमोलिक यांना हे समजल्यानंतर त्यांनी याबाबत विचारले असता, काही एक बोलण्यास नकार दिला.

सून डेझी नरेंद्र भोसले यांच्याकडे ताबा मागण्यास अमोलिक गेल्या असता, तिने अमोलिक यांना 25 लाख रुपये मागितले, अन्यथा मी ताबा देणार नाही, असे सांगितले.

गेली एक वर्ष ती या घरामध्ये अनधिकृतपणे राहत आहे. अमोलिक या गृहवित्त संस्थेचा दरमहा 40 हजार रुपयांचा हप्ता भरत आहेत. परंतु त्यांना एक रुपयाही भाडे न देता डेझी भोसले तिथे अनधिकृतपणे राहात आहे, असा आरोप अमोलिक यांनी केला आहे.

दरम्यान, कर्ज काढून त्यांनी ही रक्कम दिलेली असल्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असून दरमहा तब्बल 40 हजार रुपयांचा हप्ता भरताना त्यांना आवाक्याबाहेरचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

एवढे करूनही घराचा ताबा मिळत नसल्याने प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पोलीस चौकीपासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पाठपुरावा करूनही त्यांना कोठूनही मदत मिळाली नाही.

अमोलिक यांनी त्यांना न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तसेच त्यांच्या मृत्यूस श्रीमती वसुंधरा वसंत भोसले (रा. द्वारा डॉ. तेजराज ढेंगळे, साई प्राईड, ढेंगळे कॉर्नर, मेन रोड, विजयनगर, काळेवाडी), डेझी नरेंद्र भोसले (रा. स. नं. 100/02, गणेश कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) व डॉ. तेजराज ढेंगळे (रा. साई प्राईड, ढेंगळे कॉर्नर, मेन रोड, विजयनगर, श्री हॉस्पिटलजवळ, काळेवाडी) यांना जबाबदार धरण्यात यावे, असे म्हटले आहे.

कोरोना योद्धा असणाऱ्या निशिगंधा अमोलिक यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

या प्रकरणात अमोलिक यांची सरळसरळ आर्थिक फसवणूक झालेली असताना, हे दिवाणी प्रकरण असल्याचे भासवून पोलीस हात झटकू शकत नाहीत. या भूमिकेमुळे अशा प्रकारे सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या ‘रॅकेट’ला ताकद देण्याचे काम पोलीस करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

डॉ. तेजराज ढेंगळे हा या सर्व प्रकरणाचा सूत्रधार असून तो खरोखरच डॉक्टर आहे का, याचीही सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही समक्ष भेटून या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून एका कोरोना योद्धा महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घालणार असल्याचे नाईक यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.