Wakad : प्रवाशाला जीवे मारण्याची धमकी देत लुटणाऱ्या दोघांना पाच तासांत अटक

एमपीसी न्यूज – प्रवासी तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणा-या दोघांना वाकड पोलिसांनी पाच तासांत अटक केली. चोरट्यांकडून चोरी केलेल्या मालासह गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे.

स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय 21, रा. काळेवाडी), आकाश शिवकुमार कंपा (वय 23, रा. डिलक्स चौक, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ओंकार रामदास घाडगे (वय 22, रा. चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार बुधवारी पहाटेतीनच्या सुमारास थेरगाव येथील डी मार्ट शॉप जवळ असलेल्या झोपडपट्टी येथून रिक्षातून (एम एच 14 / एच एम 2102) प्रवास करीत होते. प्रवासात रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने ओंकार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ओंकार यांच्याकडून 14 हजार 200 रुपयांचा मोबाईल फोन, मनगटी घड्याळ, बॅग आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना वाकड पोलिसांनी दोन पथके तयार केली. पोलीस उपनिरीक्षक शंभू रणवरे, पोलीस हवालदार बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, हरिचंद्र पानसरे यांना एम एच 14 / एच एम 2102 ही रिक्षा संशयितपणे ताथवडे भागात फिरत असल्याचे दिसले. त्यानुसार, पोलिसांनी ताथवडे परिसरातून आरोपी स्वप्नील, आकाश यांना त्यांच्या रिक्षासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.