Wakad : घरासमोर बॉल आल्याच्या कारणावरून दोन लहान मुलींसह महिलेला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दोन लहान मुली घरासमोर बॉल खेळत होत्या. खेळता खेळता त्यांचा बॉल समोरच्या घरासमोर गेला. बॉल आणण्यासाठी दोन लहान मुलींना घरातील सहा जणांनी मारहाण केली. तसेच मुलींना सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला देखील मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी सव्वासहा वाजता वाकड गावठाण येथे घडला.

पूजा किरण वाघमारे (वय 29, रा. वाकड गावठाण) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय निवृत्ती वाघमारे, विशाल वाघमारे, रुपेश शिंदे, संगीता वाघमारे, रोहिणी कांबळे, हौसाबाई शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तनिषा आणि तिची मावस बहीण नजमा या दोघी त्यांच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर बॉल खेळत होत्या. खेळता खेळता त्यांचा बॉल आरोपी वाघमारे याच्या घरासमोर गेला. दोन्ही मुली बॉल आणण्यासाठी गेल्या असता ‘तुमचा बॉल इकडे का आला?’ या कारणावरून आरोपींनी मुलींना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलींना आरोपींच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादी यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.