Wakad: तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींना वाकड पोलिसांकडून बेड्या

Wakad: Accused in youth murder case handcuffed by Wakad police

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून 18 वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून तसेच दगडाने मारून निर्घृणपणे खून केला. या प्रकरणातील चारही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

गुड्या उर्फ किशोर ज्ञानदेव शेलार (रा. लिंक रोड, चिंचवड), सिजीन फिलिप जॉर्ज (वय 26, रा. काळेवाडी, पुणे), रोहित ललन सिंग (वय 22, रा. काळेवाडी, पुणे), सचिन सोनू साठे (वय 26, रा. काळेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

ऋषभ बालाजी गायकवाड (वय 18, रा. जगतापनगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रमोद किसन गायकवाड (वय 26, रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी आरोपी जॉर्ज आणि मयत ऋषभ यांचे भांडण झाले होते. या भांडणात दोघांनी एकमेकांना मारहाण केली. त्यात जॉर्ज याच्या अंगावर व्रण उठले होते. याचा राग जॉर्जच्या मनात होता.

दरम्यान, आरोपी गुड्या याला एका गुन्ह्यात अटक झाली होती. त्याला जमीन मिळवून देण्यासाठी आरोपी जॉर्ज याने प्रयत्न केले होते. जॉर्ज याने केलेल्या मदतीची परतफेड गुड्या याला करायची होती.

जॉर्ज याला मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी चारही आरोपींनी संगनमत केले. त्यानुसार त्यांनी ऋषभ याला मारण्याचा प्रयत्न देखील केला.

मात्र, दोन ते तीन वेळेला आरोपींचा प्रयत्न फसला. शुक्रवारी पुन्हा आरोपींनी एकत्र येऊन ऋषभ याला मारण्याची तयारी केली.

शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहा वाजता ऋषभ थेरगाव गावठाण येथे पवना नदीच्या काठावर आला होता. ही संधी साधून आरोपींनी ऋषभवर कोयत्याने सपासप वार केले.

यात ऋषभ याच्या डोक्यात, पोटावर, हातावर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी त्याला दगडानेही मारले. यात ऋषभचा मृत्यू झाला.

खून केल्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. वाकड पोलिसांनी तीन पथके तयार करून आरोपींच्या मागावर रवाना केली.

वाकड पोलिसांच्या पथकांनी सर्व आरोपींना शिताफीने अटक करून आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.