Wakad : पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

युनूस गुलाब आत्तार (वय 50), मतीन युनूस आत्तार (वय 28), मोईन युनूस आत्तार (वय 24, तिघे रा. भारत माता चौक, काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई शंकर विश्वभर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. ते सोमवारी काळेवाडी परिसरात काम करीत होते. त्यावेळी आरोपी युनूस रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळले. त्यामुळे कळकुटे यांनी त्याला हटकले. यावरून आरोपीने कळकुटे यांच्याशी हुज्जत घातली. आरोपी मतीन याने काठीने तर अन्य दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.

कळकुटे यांच्या हातातील काठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, आपत्ती व्यवस्थापन कायदा, कोविड 19 उपाययोजना 2020, साथीचे रोग अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

वाकड पोलिसांनी तिघांना तात्काळ अटक केली. आरोपींना मंगळवारी (दि. 28) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.