Wakad : नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज – नो पार्किंग परिसरात तसेच कॉर्नरवर पार्क केलेल्या वाहनांवर हिंजवडी वाहतूक विभागाने कारवाई केली. यामध्ये सुमारे 35 वाहनांना जॅमर लावण्यात आले. वाहनचालकांकडून दंडाची रक्कम घेऊन त्यांना सोडण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी हिंजवडी वाहतूक विभागात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या आहेत. नो पार्किंग परिसरात पार्किंग करणे, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी आज (बुधवारी) कारवाई केली.

  • डांगे चौकातील पुलाखाली, रस्त्याच्या वळणावर वाहनचालकांकडून नो पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने पार्क करण्यात येत आहेत. या वाहनांमुळे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अडथळा येतो. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करणे आवश्यक आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नो पार्किंग परिसरात वाहने लावलेल्या सुमारे 35 वाहनांवर कारवाई करण्यात आली. सर्व वाहनांना जॅमर लावण्यात आले.

हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे म्हणाले, “जॅमर लावलेल्या वाहन चालकांकडून नो पार्किंग परिसरात वाहने लावल्यामुळे 200 रुपये दंड घेण्यात आला. तसेच त्या वाहन चालकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल आणखी 200 रुपये आणि त्या वाहनचालकांकडे हेल्मेट नसल्यास आणखी 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या वाहनचालकांकडून हिंजवडी वाहतूक पोलिसांनी 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.