Wakad : बिलाचा तपशील देण्यास आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाचा नकार; पोलिसांसमोर रुग्णालय प्रशासनाची नरमाईची भूमिका

रुग्णाचे नातेवाईक राहुल राउळ यांची माहिती

एमपीसी न्यूज – रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर आलेल्या बिलाचा तपशील रुग्णाच्या नातेवाईकांनी मागितला असता त्याला रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. सुमारे दहा तास रुग्णालय प्रशासनाच्या मागे लागूनही तोडगा निघत नसल्याने नातेवाइकाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस रुग्णालयात आले असता रुग्णालय प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत बिलाच्या तपशीलावर चर्चा करण्यास संमती दिली. नातेवाइकांनी याबाबत शारीरिक व मानसिक त्रास झाल्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. हा प्रकार थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात शनिवारी (दि. 21) घडला.

राहुल राउळ यांच्या आई वंदना राउळ यांना शनिवारी (दि. 14) रात्री आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल केले. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर त्यांना शनिवारी (दि. 21) डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर रुग्णालयात बिलावरून झालेल्या गोंधळात डिस्चार्ज झालेल्या डिस्चार्ज झाल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी तब्बल 14 तास लागले. याबाबत रुग्णालयात प्रशासनाकडून झालेल्या शारीरक व मानसिक त्रासाबाबत तसेच त्यांच्या रुग्णालयातील आक्षेपाबाबत रितसर वाकड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

राउळ यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, राहुल यांच्या आईला आदित्य बिर्ला रुग्णालयात व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नाही. शनिवारी (दि. 21) सकाळी दहा वाजता त्यांना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यापासून राहुल बिला संदर्भात चौकशी करत होते. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन दुपारी तीन वाजेपर्यंत रुग्णाला घरी जाता येईल, असे रुग्णालयाकडून सुरुवातीला सांगण्यात आले. पण पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी साडेसहा वाजले.

रुग्णालयाचे बिल 97 हजार रुपये आले. त्यामध्ये विमा कंपनीकडून सुरुवातीला 72 हजार रुपये आणि त्यानंतर आणखी काही रक्कम मंजूर झाली. उर्वरित रक्कम राहुल यांना भरायची होती. त्यासाठी बिलाच्या रकमेचा तपशील राहुल यांनी रुग्णालय प्रशासनाकडे मागितला. तो तपशील देण्यास रुग्णालय प्रशासनाकडून नकार देण्यात आला. काही वेळाने काही मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर रुग्णालयाकडून काही अंशी चर्चा करण्यासाठी सहमती झाली. पण पूर्ण बिलावर चर्चा करण्यास रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही.

बिलावर चर्चा न करता बिलिंग विभाग बंद करून अधिकारी निघून गेले. जाता जाता त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापक उदय यांच्याशी बोलायचा सल्ला राहुल यांना दिला. बिलिंग विभाग बंद होत असल्याने रुग्ण घरी कसा न्यायचा, असे विचारले असता ‘तुम्हाला पूर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णाला घरी नेता येणार नाही’ असे सांगण्यात आले. त्यावर ‘मी पैसे भरायला तयार आहे. पण बिलामध्ये माझ्या काही शंका आहेत. त्याबाबत चर्चा करायची आहे. त्यानंतर जे काही बिल असेल ते मी द्यायला तयार आहे, असे राहुल यांनी सांगितले.

त्यावर ‘आम्ही चर्चा करणार नसून हे बिल फायनल आहे. तुम्हाला ते भरावे लागेल. नाहीतर आम्ही पेशंट सोडणार नाही’ अशी ताठर भूमिका रुग्णालय प्रशासनाने शेवटपर्यंत घेतली. रुग्णालयाने राहुल यांची अडवणूक केली. दहा वाजेपर्यंत तोडगा काढण्याचे सांगितले असता रुग्णालयाने काहीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे राहुल यांनी 100 क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस रुग्णालयात येताच रुग्णालय प्रशासनाने त्यांची भाषा बदलली. ‘तात्पुरती आगाऊ रक्कम’ घेऊन राहुल यांच्या आईला घरी सोडण्यात आले.

सोमवारी चर्चा करून पूर्ण आणि पक्के बिल सोमवारी तयार करण्यास रुग्णालय प्रशासन तयार झाले. मात्र, राहुल आणि त्यांच्या आईला याबाबत झालेल्या शारीरक व मानसिक त्रासाबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

राहुल राउळ म्हणाले, “आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाने जाणीवपूर्वक बिलाबाबत विलंब केला. सर्व कर्माचा-यांना जाऊ दिले, विमा कंपनी कार्यालय बंद होऊ दिले आणि नंतर बिल भरण्याची कोंडी केली. दरम्यान, रुग्णालयातील बाउन्सरने देखील येऊन अरेरावी आणि नंतर माझी बाजू घेत असल्याचे भासवले. हा प्रकार गंभीर आहे. रुग्णालयात ज्या सेवा मिळाल्या नाहीत, त्याचेही बिल लावण्यात आले आहे. त्यामुळे ज्या सेवा मिळाल्या नाहीत. त्याचे पैसे देणार नाही. नातेवाईकांना काहीही न सांगता अनावश्यक तपासण्या केल्या जातात. केवळ बिलाचा आकडा फुगवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. विमा कंपनीकडून बिल मिळत असल्याने नागरिक रुग्णालयाच्या या कारभाराकडे लक्ष देत नाहीत. मात्र, एखाद्याने मनावर घेऊन जाब विचारण्याचे धाडस केल्यास त्यास रुग्णालय प्रशासन अडकवून ठेवते. ही अरेरावी थांबली पाहिजे, असेही राउळ म्हणाले.

दरम्यान, राउळ यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वाकड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या संदर्भात आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनासोबत संपर्क साधला असता ‘आमचे म्हणणे लवकरच कळवू’, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचे रुग्णाच्या नातेवाईकाच्या तक्रारीबाबतचे म्हणणे प्राप्त होताच ते या बातमीत समाविष्ट केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.