Wakad : गाडी न दिल्याच्या कारणावरून एकावर खुनी हल्ला, चौघांना अटक

एमपीसी न्यूज – गाडी न दिल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकावर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री नऊच्या सुमारास साईनाथनगर थेरगाव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

अक्षय उर्फ आकाश अनिल जाधव (वय 23), स्वप्नील अनिल जाधव (वय 25), अनिल गोविंद जाधव (वय 48, सर्व रा. साईनाथनगर थेरगाव), मयूर अशोक पवळे (वय 21, रा. पवार कॉलनी, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन प्रकाश रूपटक्के (वय 36, रा. श्रीकृष्ण कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सचिन साईनाथनगर येथील स्वामी समर्थ लॉन्ड्रीसमोर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी अक्षय याने त्याच्या एका मित्राला सचिन यांच्याकडे गाडी मागण्यासाठी पाठवले. सचिन यांनी त्यांची दुचाकी त्याला दिली नाही. या कारणावरून आरोपी अक्षय याने सचिन यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अन्य आरोपींनी सचिन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.