Wakad : ‘म्हातोबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात बगाड उत्साहात

एमपीसी न्यूज – आयटीनगरीच्या रुपात नावारुपाला आलेल्या हिंजवडीने अजूनही आपल्या गौरवशाली परंपरांची कास सोडलेली नाही. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार आज शुक्रवारी (दि. 19) हिंजवडीचे ग्र्रामदैवत म्हातोबा महाराजांच्या उत्सवांतर्गत बगाड उत्साहात पार पडले.

पंचक्रोशीतील हजारो आबालवृद्ध व महिला भाविकांबरोबरच हा उत्साह आणि उत्सव पाहण्यासाठी आयटी अभियंत्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. भंडारा व खोबरे उधळीत हलगीच्या तालात भाविकांचा जल्लोष जणू काही गगनाला भिडत होता. आपले आराध्य म्हातोबारायांकडे सर्वांना सुखी ठेवावे, असे साकडे देखील हिंजवडी ग्रामस्थांनी घातले.

  • बगाड मिरवणूक हिंजवडी गावठाणातील होळी मैदानातून सुरु झाली आणि सायंकाळी उशिरा वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात पोहचली. यावर्षी जांभूळकर घराण्याच्या वाड्यातील दत्तात्रय सोपान जांभुळकर यांना गळकरी होण्याचा मान मिळाला.

हिंजवडीकडून साखरे पाटील घराण्यातील किसन निवृत्ती साखरे तसेच संदीप पंढरीनाथ साखरे, वाकडकडून पांडुरंग सुतार यांनी गळ टोचल्याची माहिती देण्यात आली. खांदेकरी म्हणून रामदास रोहिदास साखरे आणि दिनेश सुरेश साखरे यांना मिळाला. तर, गळक-यांना आबा तुकाराम पारखी यांना माळ घालण्याचा मान मिळाला.

  • मंदिरात मानाची कावड गेल्यानंतर गळकऱ्याच्या गळ्यात माळ टाकल्यानंतर त्याला स्नान करवून लाल धोतर आणि लाल पगडी हा देवाचा पोशाख नेसविला. म्हातोबाचे दर्शन घेऊन खांदेकऱ्यांच्या मदतीने त्याला दर्शनासाठी मारुती मंदिरात नेण्यात आले. त्यानंतर गळ टोचलेल्या दत्तात्रय सोपान जांभुळकर यांना बगाड रिंगण मैदानात नेऊन बगाडावर बसवून भाविकांच्या साक्षीने गोल रिंगण मारण्यात आले. म्हातोबाच्या नावाने चांगभलंच्या जयघोषात आयटीनगरी दुमदुमली.

गावकऱ्यांच्या हातातील काठी उंचावून काठी नाद केला. ‘पैस…पैस… म्हातोबाच्या नावानं चांगभलं’ या गजराने आसमंत दुमदुमून गेले होते. अशा श्रद्धा आणि उत्साहाने भारावलेल्या वातावरणात पुढील विधी पार पडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.